सांगोला चिंचोली रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला पहाटे पोलिसांची कारवाई; १ ब्रास वाळूसह ६ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगोला / सांगोला शहरातील चिंचोली रोडवर शासनाची रॉयल्टी न भरता व आवश्यक परवानगीशिवाय वाळूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी टेम्पोवर
सांगोला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत अंदाजे १ ब्रास वाळूसह अशोक लेलंड बडा दोस्त प्लस टेम्पो असा एकूण ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अमोल प्रकाश साळुंखे (वय २६, रा. बामणी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
सांगोला पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचारी अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशानुसार
पोका/१७८ मारुती दत्ता पांढरे, पोहेका/१५७८ राजगे, पोका/२७६ सावंजी व पोका/८०३ साबळे हे खाजगी वाहनातून सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
गोपनीय माहिती मिळताच पोलिसांची धाव
दरम्यान, पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत चिंचोली रोडवरून एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिंचोली रोड परिसरात जाऊन वाहनांची तपासणी सुरू केली.
पहाटे सुमारे ६ वाजता पोलिसांना संशयित चारचाकी वाहन येताना दिसले. पोलिसांनी हाताचा इशारा करून वाहन थांबविले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल प्रकाश साळुंखे असल्याचे सांगितले.
रॉयल्टी अन् परवान्याची चौकशी
पोलिसांनी वाहनातील वाळूबाबत तसेच वाळूचा उपसा व वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रॉयल्टी व परवान्याबाबत चालकाकडे विचारणा केली. मात्र, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
यानंतर वाहनाची तपासणी केली असता टेम्पोच्या मागील हौद्यात अंदाजे १ ब्रास वाळू आढळून आली. वाळूची अंदाजे किंमत ७ हजार रुपये, तर अशोक लेलंड बडा दोस्त प्लस टेम्पोची किंमत ६ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी वाळूसह टेम्पो ताब्यात घेऊन सांगोला पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केला. या कारवाईत एकूण ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई
शासनाची रॉयल्टी न भरता, आवश्यक परवानगी न घेता तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा पद्धतीने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याची वाहतूक केल्याचा आरोप पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोका/१७८ मारुती दत्ता पांढरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, सांगोला पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.


0 Comments