Breaking News

सांगोल्यात खळबळ! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर गंभीर आरोप करत ४२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन मेडशिंगीतील दत्तात्रय पाटोळे यांची आत्महत्या; व्हिडीओतील आरोपांमुळे प्रकरण चर्चेत

सांगोल्यात खळबळ! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर गंभीर आरोप करत ४२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन मेडशिंगीतील दत्तात्रय पाटोळे यांची आत्महत्या; व्हिडीओतील आरोपांमुळे प्रकरण चर्चेत


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर व्हिडीओ ठेवून गंभीर आरोप केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या घटनेमुळे सांगोला आणि मंगळवेढा परिसरात खळबळ उडाली असून, मंगळवेढा पोलिसांत या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

दत्तात्रय नामदेव पाटोळे (वय ४२, रा. मेडशिंगी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधू दयानंद नामदेव पाटोळे यांनी पोलिसांकडे माहिती दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पाटोळे हे ५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता दातपुर (ता. मोहोळ) येथून मेडशिंगीकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, दुपारपर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

दुपारी सुमारे १२.४५ वाजता त्यांच्या पत्नीने कुटुंबीयांशी संपर्क साधून दत्तात्रय घरी पोहोचले का, 

अशी विचारणा केली. ते अद्याप घरी आले नसल्याचे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, दत्तात्रय यांच्या एका चुलत भावाने त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर व्हिडीओ असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. 

या व्हिडीओमध्ये दत्तात्रय पाटोळे यांनी एका व्यक्तीवर आपल्या आयुष्याचे नुकसान केल्याचा तसेच पत्नी आणि सासू-सासऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. 

या प्रकरणाला संबंधित व्यक्ती जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी व्हिडीओत केला असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडीओची माहिती मिळताच नातेवाईकांनी सांगोला, मंगळवेढा तसेच खोमनाळ परिसरात त्यांचा शोध सुरू केला. 

अखेर ६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मंगळवेढा शहरातील खोमनाळ रोडवरील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून, व्हिडीओतील आरोपांसह सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे मेडशिंगीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमधील गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments