सांगोल्याचा ऐतिहासिक जलवारसा धोक्यात! जुन्या विहिरी दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर नगरपरिषदेने तातडीने सर्वेक्षण करून विहिरींचे संवर्धन व पुनर्जीवन करावे; इतिहासप्रेमींची मागणी
सांगोला | प्रतिनिधी : सांगोला शहराच्या प्राचीन इतिहासाची आणि तत्कालीन जलव्यवस्थेची साक्ष देणाऱ्या जुन्या विहिरी आज
काळाच्या ओघात दुर्लक्षित होताना दिसत आहेत. एकेकाळी शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या आणि पाणीपुरवठ्याचा
प्रमुख आधार असलेल्या या ऐतिहासिक विहिरी आज देखभाल व संवर्धनाअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता इतिहासप्रेमी व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वीच्या काळात सांगोला शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात या विहिरींना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. पिण्याचे पाणी,
घरगुती वापर तसेच इतर आवश्यक गरजांसाठी नागरिक या विहिरींवर अवलंबून होते.
त्यामुळे या विहिरी केवळ पाण्याचे स्रोत नसून सांगोल्याच्या प्राचीन सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
मात्र, कालांतराने नळपाणीपुरवठा व आधुनिक जलव्यवस्था विकसित झाल्यानंतर या जुन्या विहिरींकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
अनेक विहिरींमध्ये गाळ साचला असून कचरा, झाडाझुडपे आणि अस्वच्छता वाढली आहे.
काही ठिकाणी विहिरींच्या बांधकामाचीही दुरवस्था झाल्याने या ऐतिहासिक वास्तूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
इतिहासप्रेमींच्या मते, शहरातील जुन्या विहिरींचे जतन करणे ही काळाची गरज आहे. सांगोला नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व प्राचीन विहिरींचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांची नोंद घ्यावी.
त्यानंतर स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती, संरक्षण भिंतींची उभारणी आणि आवश्यक तेथे सुशोभीकरण करून या विहिरींचे संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
तसेच पाणीसंकटाच्या पार्श्वभूमीवर शक्य असलेल्या विहिरींचे पुनर्भरण व पुनर्जीवन केल्यास भविष्यात त्यांचा जलस्रोत म्हणूनही उपयोग होऊ शकतो.
पावसाचे पाणी साठवणूक आणि भूजल पातळी वाढविण्यासाठीही या विहिरी उपयुक्त ठरू शकतात.
“जुन्या विहिरी म्हणजे केवळ दगड-मातीची रचना नाही, तर त्या सांगोला शहराच्या इतिहासाचा जिवंत वारसा आहेत.
हा वारसा जपणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” अशी भावना इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे सांगोला नगरपरिषद प्रशासनाने या ऐतिहासिक विहिरींच्या संवर्धनासाठी तातडीने ठोस आराखडा तयार करून आवश्यक
उपाययोजना कराव्यात आणि शहराचा हा प्राचीन जलवारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





0 Comments