३ महिने मोफत मुतखडा व मूत्ररोग उपचार शिबिर; सांगोल्यात दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा उपक्रम
सांगोला | प्रतिनिधी : सांगोला शहरातील जय भवानी चौक परिसरात असलेल्या दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी विशेष मूत्ररोग, मुतखडा निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर ३ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तब्बल तीन महिने चालणार असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये सांगलीतील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. आदिन चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूत्ररोगांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत. तसेच पात्र रुग्णांना विविध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार, किडनीचे विविध आजार, किडनीवरील सूज, किडनीतील खडे, मूत्रवाहिनीतील खडे, मूत्राशयातील खडे यांसह लघवीशी संबंधित विविध समस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. वारंवार लघवी होणे,
लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होणे, मार्गामध्ये पडदे तयार होणे, लघवी न होणे तसेच स्त्री व पुरुषांच्या मूत्रमार्गाशी संबंधित विविध आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट व उपचाराच्या फाईल्स सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या रुग्णांना मूत्ररोगासंबंधी शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे, अशा पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना
यांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ देण्यात येणार आहे. केशरी, पिवळे व पांढरे रेशनकार्डधारक पात्र रुग्णांना या योजनांचा लाभ मिळू शकतो.
विशेष म्हणजे, या शिबिरामध्ये आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. आयुष्मान कार्डसाठी ऑनलाईन रेशन कार्ड अथवा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोलापूर व सांगली जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, आटपाडी, जत व पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. निरंजन केदार, कन्सल्टंट मूत्ररोग विभाग, दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : पहिला मजला, दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, सांगोला
संपर्क : 9145124579 / 8010551108
गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी तीन महिन्यांच्या या विशेष आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.


0 Comments