टँकर मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांऐवजी प्रांताधिकाऱ्यांना अधिकार द्या; दिपकआबा साळुंखे पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
सांगोला | तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावोगावी टँकर सुरू करण्याची प्रक्रिया जलद व्हावी, यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे प्रांताधिकारी यांना देण्यात यावेत,
अशी महत्त्वपूर्ण मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी सांगोला तालुक्यावर वरुणराजाची अपेक्षित कृपादृष्टी झालेली नाही.
अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
सध्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकरची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, टँकर मंजुरीचे अधिकार सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने प्रस्ताव मंजूर होऊन
प्रत्यक्ष टँकर सुरू होण्यास विलंब होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यातील माण नदीत टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आल्याने सुमारे १५ ते २० गावांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, तालुक्यातील परिस्थिती अद्यापही गंभीर असून सुमारे ७० ते ८० गावे पिण्याच्या पाण्याच्या समस्येशी झुंज देत आहेत.
यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामावरही मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विविध गावांतून टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत.
मात्र, स्थानिक स्तरावर किंवा प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने मंजुरी देण्याचे अधिकार नसल्याने प्रक्रिया लांबत असल्याचा मुद्दा दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत निर्णयप्रक्रिया जलद होण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सांगोला तालुक्यातील निम्म्याहून अधिक भाग अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत असल्याने या परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिक आणि पशुधनाला दिलासा
देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


0 Comments