Breaking News

मनोज जरांगेंच्या ताफ्यातील ‘डिफेंडर’ची चर्चा; सांगोल्यातील सुभाष भोसले यांनी सांगितली गाडी देण्यामागची कहाणी

मनोज जरांगेंच्या ताफ्यातील ‘डिफेंडर’ची चर्चा; सांगोल्यातील सुभाष भोसले यांनी सांगितली गाडी देण्यामागची कहाणी


‘नव्या गाडीत देव बसावा’ या भावनेतून घेतली डिफेंडर; तब्बल १ कोटी ९० लाखांची गाडी, दीड कोटींचे कर्ज

सांगोला : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. 

त्यांच्या सभांना आणि दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद चर्चेत असतानाच त्यांच्या ताफ्यातील पांढऱ्या रंगाची आलिशान ‘डिफेंडर’ गाडीही चर्चेचा विषय ठरली आहे.

 ही गाडी नेमकी कोणाची आणि जरांगेंना ती कशी मिळाली, याबाबत आता सांगोला तालुक्यातील चीक महूद येथील व्यापारी व प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी माहिती दिली आहे.

सुभाष भोसले यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही डिफेंडर गाडी खरेदी केली. आंदोलन आणि उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रवासातील त्रास कमी व्हावा,

 यासाठी आरामदायी गाडी उपलब्ध करून देण्याचा विचार मनात आला. विशेष म्हणजे, आपल्या नव्या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावे, अशी भोसले यांची इच्छा होती.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे झालेल्या सभेनंतर भोसले यांनी ही गाडी जरांगे-पाटील यांना वापरण्यासाठी दिली. गाडीतील सुविधांमुळे त्यांचा प्रवास तुलनेने आरामदायी व्हावा आणि दौऱ्यात होणारा त्रास कमी व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे भोसले यांनी सांगितले.

‘आमच्या समाजासाठी मनोजदादा देवासमान’

मनोज जरांगे यांच्याबद्दल असलेल्या आपल्या भावना व्यक्त करताना सुभाष भोसले यांनी, “नवीन गाडीत देव बसावा, अशी माझी इच्छा होती. आमच्या समाजासाठी मनोजदादा देवासमान आहेत,” अशी भावना व्यक्त केली.

भोसले कुटुंबीयांचा सराफा व्यवसाय असून शेतीही आधुनिक पद्धतीने केली जाते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि त्यांच्याविषयी असलेल्या निष्ठेतून ही गाडी वापरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिफेंडरची किंमत तब्बल १ कोटी ९० लाख

मनोज जरांगे यांच्या वापरात असलेल्या या डिफेंडरची किंमत सुमारे १ कोटी ९० लाख रुपये असल्याचे सुभाष भोसले यांनी सांगितले. या गाडीसाठी त्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

सुरुवातीला मनोज जरांगे यांनी एवढी महागडी गाडी वापरण्यास नकार दिला होता. मात्र, भोसले यांच्या आग्रहानंतर त्यांनी ही गाडी दौऱ्यासाठी स्वीकारली.

‘गाडी माझी नाही, कार्यकर्त्याने वापरायला दिली’ – जरांगे

दरम्यान, डिफेंडर गाडीवरून सुरू झालेल्या चर्चेवर मनोज जरांगे-पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले होते. ही गाडी आपली नसून एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.

“माझ्याकडे एक रुपयाही नाही. एका कार्यकर्त्याने मला गाडी वापरायला दिली. त्याने सांगितले की, मला देवाने भरपूर दिले आहे, तुम्ही माझ्या गाडीत बसा. त्यामुळे मी या गाडीतून दौरा करत आहे,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.

मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते आपापल्या वाहनातून आपल्याला प्रवासासाठी घेऊन जातात. समाजातील लोकांचे आपल्यावर प्रेम असल्याने ते आग्रह करतात आणि आपण त्यांच्या गाडीतून प्रवास करतो, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असल्याने डिफेंडरच्या काचा फुटल्याचेही जरांगे यांनी सांगितले. “५०-५० पोरं गाडीला लटकतात,” असे सांगत त्यांनी दौऱ्यातील गर्दीची परिस्थिती स्पष्ट केली.

मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील या डिफेंडरची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून, गाडी देणाऱ्या सुभाष भोसले यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Post a Comment

0 Comments