Breaking News

ग्रीन झोनमधील 2 गुंठे क्षेत्रालाही घरकुलासाठी बांधकाम परवाना द्या; अन्यथा 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा मा.सतीशभाऊ सावंत

ग्रीन झोनमधील 2 गुंठे क्षेत्रालाही घरकुलासाठी बांधकाम परवाना द्या; अन्यथा 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा मा.सतीशभाऊ सावंत 


सांगोला | प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीतील शहर व वाड्यावस्त्यांवरील ग्रीन झोनमधील 2 गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या 

नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी बांधकाम व वापर परवाना तातडीने देण्यात यावा, 

अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल,

 असा इशारा माजी बांधकाम समिती सभापती सतीश सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बेघर कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा आहे.

 सांगोला शहरातील अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले असले, 

तरी ग्रीन झोनमधील बांधकाम परवानगीच्या अटींमुळे अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत.

सांगोला नगरपालिका हद्दीतील अनेक वाड्यावस्त्यांमध्ये नागरिकांकडे केवळ 2 ते 3 गुंठे क्षेत्र आहे. मात्र, ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवानगीसाठी 40 आर (सुमारे 1 एकर)

 क्षेत्राची अट लावण्यात आल्याने पात्र लाभार्थ्यांना घर बांधणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने ग्रीन झोनमध्ये घरकुलासाठी बांधकाम व वापर परवाने दिल्यामुळे अनेक नागरिकांनी घरे उभारली होती.

 मात्र, नंतर अचानक ही प्रक्रिया बंद करण्यात आल्याने अनेकांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

 परवान्यासाठी नागरिकांना वारंवार पालिकेच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, ग्रीन झोनमधील 2 गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या पात्र लाभार्थ्यांना बांधकाम व वापर परवाना

 दिल्यास गरीब नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. तसेच नगरपालिकेच्या कर व पाणीपट्टीच्या उत्पन्नातही वाढ होईल.

यासंदर्भात शासन व नगरपालिका प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी 

सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments