Breaking News

सांगोल्यात दिवसाढवळ्या सिनेस्टाईल चोरी; कारची काच फोडून ४ लाखांची रोकड पळवली

सांगोल्यात दिवसाढवळ्या सिनेस्टाईल चोरी; कारची काच फोडून ४ लाखांची रोकड पळवली


ICICI बँकेतून पैसे काढल्यानंतर काही मिनिटांतच चोरट्यांचा डाव; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरात शुक्रवारी (दि. १० जुलै) दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 ICICI बँकेतून काढलेली तब्बल ४ लाख रुपयांची रोकड कारमध्ये ठेवताच अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून क्षणार्धात लंपास केली.

या प्रकरणी अमोल सखाराम येलपले (वय ३७, रा. यलमार-मंगेवाडी) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल येलपले हे पत्नी अर्चना यांच्यासह सकाळी सांगोल्यातील ICICI बँकेत गेले होते.

 तेथून त्यांनी ४ लाख रुपयांची रोकड काढून प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवली. 

त्यानंतर मित्राच्या स्विफ्ट (MH 13 BN 7791) या कारच्या गिअरबॉक्सजवळ ती बॅग ठेवून दोघेही मार्केट यार्ड परिसरातील HP गॅस सेंटरमध्ये कामानिमित्त गेले.

दरम्यान, काही वेळाने अर्चना येलपले यांची नजर गाडीवर गेली असता कारच्या डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली.

 त्यांनी तत्काळ अमोल येलपले यांना बोलावले. दोघांनी गाडीची पाहणी केली असता रोकड असलेली कॅरीबॅग गायब झाल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या रकमेमध्ये ₹५०० च्या नोटांचे आठ बंडल, अशी एकूण ₹४ लाखांची रोकड होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सांगोला शहरात खळबळ उडाली असून, 

नागरिकांनी वाहनांमध्ये रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments