Breaking News

बामणीत धक्कादायक प्रकार! उपचार नाकारल्याने गर्भवतीची रस्त्यावर प्रसूती; डॉक्टरांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

बामणीत धक्कादायक प्रकार! उपचार नाकारल्याने गर्भवतीची रस्त्यावर प्रसूती; डॉक्टरांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी


 आरोग्य उपकेंद्रातील कथित निष्काळजीपणा विरोधात गाव बंद; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

सांगोला, प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील बामणी येथील आरोग्य उपकेंद्रात गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिची रस्त्यावर प्रसूती झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामणी येथील रहिवासी श्रीमती जनाबाई एरी भोसले यांच्या सुनेला ८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्याने 

बामणी येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेला रक्तस्त्राव होत असतानाही तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेस व तिच्या नातेवाईकांना उपकेंद्रातून बाहेर जाण्यास सांगितले. नातेवाईकांनी वारंवार विनंती करूनही 

उपचार न मिळाल्याने पहाटेच्या सुमारास महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे माता व नवजात बालकाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेविरोधात शनिवारी (११ जुलै) बामणी गावात निषेध व्यक्त करण्यात आला. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा परिषद सदस्य अतुल (मालक) पवार यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास १४ जुलै २०२६ रोजी पंचायत समिती, सांगोला कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टीप : वरील वृत्त तक्रारदारांनी केलेल्या आरोपांवर आधारित आहे. संबंधित आरोग्य अधिकारी किंवा प्रशासनाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments