तोतया पोलिसांचा धक्कादायक प्रकार!
ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न; सांगोल्यात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरात तोतया पोलिसांच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकारामुळे शहरातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक अरुण तुकाराम वाघमोडे हे गुरुवारी (दि. ११ जून) नेहमीप्रमाणे दूध वितरणाचे काम
आटोपून रात्री सुमारे ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान आपल्या घरी परतत होते. त्यांचे घर पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागील परिसरात आहे.
दरम्यान, नरुटे वस्ती परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. "आम्ही पोलीस आहोत,"
अशी बतावणी करत त्यांनी वाघमोडे यांची चौकशी सुरू केली. "तुमच्याकडे गुटखा, पानमसाला किंवा गांजा आहे का?" असा सवाल करत त्यांनी त्यांच्या खिशांची तपासणीही केली.
तपासणीत काहीही संशयास्पद न सापडल्याने वाघमोडे यांनी संबंधितांकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र, त्यांनी कोणतेही ओळखपत्र दाखविले नाही.
उलट, "जवळच पोलीस स्टेशन आहे, तिथे जाऊन तपासणी करा," असे वाघमोडे यांनी सांगितल्यानंतरही ते टाळाटाळ करू लागले.
याच वेळी एका संशयिताने मोबाईलच्या प्रकाशझोतात वाघमोडे यांच्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेटकडे लक्ष दिले आणि ते हिसकावण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत जवळील पाईप दुकानाकडे धाव घेत मदतीसाठी आरडाओरडा केला. दुकानदार बाहेर येईपर्यंत दोन्ही संशयित अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेबाबत अरुण वाघमोडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. त्यांनी घटनेची अधिकृत नोंद करण्याची मागणी केली असता, "अर्ज द्या, तपास करतो," असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात सायंकाळच्या वेळी नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा परिस्थितीत तोतया पोलिसांच्या नावाखाली लूटमार करण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद करावे, तसेच शहरातील गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


0 Comments