Breaking News

सांगोल्यात गावठी पिस्टल विक्रीचा कट उधळला; एलसीबीची धडक कारवाई, तीन जण अटकेत

सांगोल्यात गावठी पिस्टल विक्रीचा कट उधळला; एलसीबीची धडक कारवाई, तीन जण अटकेत


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यात बेकायदेशीररीत्या गावठी पिस्टलची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाड टाकून अटक केली.

 या कारवाईत दोन गावठी पिस्टले, चार जिवंत काडतुसे आणि तीन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले असून, एकूण ₹1 लाख 85 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि. 5 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8.40 वाजता सांगोला तालुक्यातील मौजे हातीद येथील 

पुलाखाली काही व्यक्ती गावठी पिस्टले विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत तिघांना रंगेहात ताब्यात घेतले.

या कारवाईत अवधूत सुभाष केंगार (रा. कोळा), हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (रा. किडेबिसरी) आणि आबा धोंडीराम नरळे (रा. जुनोनी) या तिघांना अटक करण्यात आली.

झडतीदरम्यान आरोपींकडून दोन सिल्व्हर रंगाची देशी बनावटीची गावठी पिस्टले, चार जिवंत काडतुसे तसेच मोटोरोला Edge 40 Neo, 

आयफोन 15 प्लस आणि व्हिवो V27 हे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. आरोपींकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 623/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम, 1959 मधील कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

 असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल शंकर घाडगे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्रे नेमकी कुठून आणण्यात आली,

 ती कोणाला विकली जाणार होती तसेच आरोपींचे इतर गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

अवैध शस्त्रांच्या व्यवहाराविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेतील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात असून, 

अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांचा कडक नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments