सांगोला मॅरेथॉनला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; १० किमी खुल्या गटात उत्तर प्रदेशच्या मनुकुमारची बाजी
सांगोला | प्रतिनिधी राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सांगोला डॉक्टर्स असोसिएशन आणि सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य, फिटनेस आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेत उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मनुकुमार याने १० किलोमीटर खुल्या गटात अवघ्या ३० मिनिटे २४ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.
सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथून स्पर्धेला सुरुवात झाली. वासूद रोडवरील माण नदी परिसरापर्यंत धावपटूंनी जोशात धाव घेतली.
१० किलोमीटर खुला गट, ५ किलोमीटर पुरुष गट आणि ५ किलोमीटर महिला गट अशा तीन विभागांत स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील नामांकित धावपटूंनी सहभाग घेतल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली.
उद्घाटन समारंभास तहसीलदार बाळूबाई भागवत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, डॉ. निकिताताई देशमुख, सूर्योदय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक अनिलभाऊ इंगवले यांनी केले, तर डॉ. संगीता पिसे यांनी निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन भारत मुढे व इरशाद बागवान यांनी केले, तर आभार डॉ. वैभव जांगळे यांनी मानले.
विशेष म्हणजे, स्पर्धकांचा उत्साह पाहून तहसीलदार बाळूबाई भागवत, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनीही धावपटूंमध्ये सहभागी होत फिटनेसचा संदेश दिला.
स्पर्धेतील प्रमुख विजेते
१० कि.मी. खुला गट
प्रथम : मनुकुमार (आग्रा, उत्तर प्रदेश) – ३०:२४
द्वितीय : दिनेश (मथुरा, उत्तर प्रदेश) – ३०:२८
तृतीय : चैतन्य रुपनर (नागज, सांगली) – ३०:३२
५ कि.मी. पुरुष गट
प्रथम : विशाल बनसोडे (नाशिक)
द्वितीय : शुभम दबके (कोल्हापूर)
तृतीय : अरविंद यादव (आग्रा, उत्तर प्रदेश)
५ कि.मी. महिला गट
प्रथम : कामिनी ठाका (पिंपरी-चिंचवड, पुणे पोलिस)
द्वितीय : स्नेहल भाऊसाहेब खरा (नाशिक)
तृतीय : मोनिका वाकले
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक प्रा. विजय पवार, डी. के. पाटील आणि सुनील भोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. रेवनील ब्लड बँक, माडगूळकर ज्वेलर्स आणि सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने सहप्रायोजक म्हणून मोलाचे सहकार्य केले.
ही मॅरेथॉन केवळ विजेते ठरवणारी स्पर्धा न ठरता, "फिट इंडिया – निरोगी समाज" हा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारा सामाजिक उपक्रम ठरला. राज्यभरातून आलेल्या धावपटूंमुळे सांगोल्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



0 Comments