Breaking News

सांगोल्यात गाय-बैल खरेदीनंतर वाहतूकच ठरते डोकेदुखी; गोरक्षकांच्या अडवणुकीमुळे शेतकरी संकटात

सांगोल्यात गाय-बैल खरेदीनंतर वाहतूकच ठरते डोकेदुखी; गोरक्षकांच्या अडवणुकीमुळे शेतकरी संकटात




सांगोला : प्रतिनिधी गाय, बैल किंवा म्हशी खरेदी करणे सोपे असले तरी ती सुरक्षितपणे घरी पोहोचवणे अनेक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. 

गोरक्षकांकडून वाहने अडवणे, कागदपत्रांची तपासणी, तसेच गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कारवाईच्या भीतीमुळे शेतकरी आणि पशुधन वाहतूकदार अडचणीत सापडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

सांगोला तालुक्यातील धायटी येथील शेतकरी दत्तात्रय कोळेकर यांनी बाजारातून शेतीसाठी बैल खरेदी केले. मात्र पंढरपूरजवळ गोरक्षकांनी वाहन अडवून बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय व्यक्त केला.

 प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर चार दिवसांनी बैल परत मिळाले. या काळात पोलिस स्टेशनच्या फेऱ्या आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक शेतकऱ्यांचा दावा आहे की, छोट्या जनावरांच्या बाजारात आवश्यक कागदपत्रे किंवा पशुवैद्यकीय प्रमाणपत्र सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे कायदेशीर खरेदी करूनही वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होतात.

दरम्यान, राज्य सरकारने गोवंशाची वारंवार बेकायदेशीर वाहतूक किंवा कत्तल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाईची तरतूद केल्याने पशुधन वाहतूकदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. काही वाहतूकदारांनी गोवंश वाहतूक टाळण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.

सरकारच्या नियमानुसार गोवंश वाहतुकीसाठी पशुवैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, खरेदीची पावती, वाहतूक परवाना, वाहनाची वैध कागदपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन आवश्यक आहे.

शेतकरी संघटनांनी बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, कायदेशीररित्या जनावरे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, यासाठी स्वतंत्र आणि सुलभ यंत्रणा उभारण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments