Breaking News

ब्रेकिंग : कडलासजवळ मान नदी परिसरात भीषण अपघात; दुचाकीवरील नवदांपत्याचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग : कडलासजवळ मान नदी परिसरात भीषण अपघात; दुचाकीवरील नवदांपत्याचा जागीच मृत्यू


सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील कडलास–सांगोला मार्गावरील मान नदी परिसरात शनिवारी (दि. 27) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 या हृदयद्रावक घटनेने वाकी (शिवणे) गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर भारत जाधव (वय 27) आणि सुजाता सागर जाधव (वय 24, रा. वाकी (शिवणे), ता. सांगोला) हे स्प्लेंडर दुचाकीवरून कडलासहून सांगोल्याकडे येत होते. 

दरम्यान, सांगोल्याकडून कडलासच्या दिशेने भरधाव येणाऱ्या GJ 05 CY 1339 क्रमांकाच्या कंटेनरची मान नदीजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अमोल नानासो जाधव यांनी तातडीने त्यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी या घटनेची माहिती एमएलसीद्वारे सांगोला पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार मयत रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली

 असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भातुंगडे पुढील तपास करीत आहेत.

अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या या दाम्पत्याच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वाकी (शिवणे) गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. गावकरी व नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments