विधानभवन परिसरात आबासाहेब देशमुख यांचे स्मारक उभारावे; डॉ. बाबासाहेब देशमुख यांची सरकारकडे जोरदार मागणी
मुंबई | पावसाळी अधिवेशन प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधत प्रभावी भूमिका मांडली.
यावेळी देशात सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित करणारे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत, विधानभवन परिसरात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली.
डॉ. देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आबासाहेब देशमुख यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करून विधानभवन परिसरात स्मारक उभारण्यात यावे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.
याचबरोबर राज्यातील वाढते अवैध वाळू उत्खनन, बेकायदेशीर दारू विक्री आणि अवैध गांजा विक्री यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अशा अवैध धंद्यांना कायमचा आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.
दुष्काळी भागातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत, पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ सिंचन योजनांद्वारे दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा मांडताना बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवून दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात वाचनसंस्कृती वाढावी यासाठी नव्या सार्वजनिक वाचनालयांना मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकहिताशी निगडित विविध प्रश्न सभागृहात ठामपणे मांडत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


0 Comments