Breaking News

घेरडीत आगीचा कहर! शेतातील घरासह संसार भस्मसात; जर्सी गायीचा मृत्यू, दुसरी गंभीर भाजली

घेरडीत आगीचा कहर! शेतातील घरासह संसार भस्मसात; जर्सी गायीचा मृत्यू, दुसरी गंभीर भाजली




सांगोला, प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील घेरडी गावात गुरुवारी (दि. ९ जुलै) दुपारी लागलेल्या भीषण आगीत शेतातील घरासह संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

या दुर्घटनेत एक जर्सी गाय होरपळून मृत्युमुखी पडली, तर दुसरी जर्सी गाय गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर उपचाराची गरज निर्माण झाली आहे.

 या घटनेमुळे शेतकरी अंकुश दगडू कोळेकर यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

घेरडी येथील गट क्रमांक १०८७/१ मधील शेतातील घरामध्ये दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले 

तरी, त्या वेळी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. त्यामुळे शेतातील घर आणि त्यातील सर्व साहित्य आगीच्या विळख्यात सापडले.

घरात बांधलेल्या जनावरांपैकी एक जर्सी गाय जागीच होरपळून दगावली, तर दुसरी गाय गंभीररीत्या भाजली. तसेच घरात साठवलेले धान्य, कपडे,

 शेतीची अवजारे, घरगुती साहित्य आणि इतर संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या.

 त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

 नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शासनाने तातडीने मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. 

एका क्षणात घर, जनावरे आणि संसार उद्ध्वस्त झाल्याने कोळेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून घेरडी परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments