नीरा देवधर कालव्यातून सांगोल्याला १ टीएमसी पाण्याच्या योजनेला वेग; मंत्रालयातील आढावा बैठकीत कामाला गती
माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; जलसंपदा मंत्र्यांकडून प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्याच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या नीरा देवधर कालवा योजनेतील १ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या कामाला
आता वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक पार पडली.
बैठकीत सर्वेक्षण, तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि पुढील कामाचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांनी सातत्याने
केलेल्या पाठपुराव्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने नीरा देवधर कालव्यातील बाष्पीभवनातून होणाऱ्या पाण्याच्या बचतीतून १ टीएमसी पाणी
सांगोला मतदारसंघासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता त्या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला.
या योजनेला शासनाचे प्राधान्य असून आवश्यक सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून काम गतीने पुढे नेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सांगोला तालुका कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि जनावरांच्या पाण्याची समस्या वर्षानुवर्षे गंभीर राहिली आहे.
अशा परिस्थितीत १ टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास हजारो शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यातील जलव्यवस्थापनासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
बैठकीस आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व
आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत तसेच नीरा देवधर कालवा समितीचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्याच्या पाणीप्रश्नावर हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून काम लवकर पूर्ण करून सांगोल्याला हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट : ‘सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष सुरूच’
नीरा देवधर कालव्यातून सांगोल्यासाठी १ टीएमसी पाणी मंजूर करण्याचा निर्णय हा माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित
असल्याचे जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी म्हटले आहे.
"सांगोल्याच्या जनतेच्या न्याय्य हक्कासाठीचा लढा अखंड सुरू राहणार आहे.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विकासाच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही ठामपणे उभे आहोत.
सांगोल्याला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील," असेही त्यांनी स्पष्ट केले.


0 Comments