Breaking News

महुदमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून ४.८० लाखांचा ऐवज लंपास

महुदमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून ४.८० लाखांचा ऐवज लंपास


महुद (ता. सांगोला) : सांगोला तालुक्यातील महुद येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 घरातील सर्व सदस्य अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून

 चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान दागिने व रोकड चोरून नेली. या घटनेमुळे महुद परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महुद येथील संजय शिवराम बाजारे (वय ५८) हे खडी क्रशरचा व्यवसाय करतात. त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने ६ जुलै रोजी संपूर्ण कुटुंबाने घराला कुलूप लावून सातारा येथे अंत्यविधीसाठी प्रस्थान केले होते.

 त्यानंतर ८ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या पुतण्याने फोन करून घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच बाजारे कुटुंब तातडीने महुद येथे परतले.

घरी पोहोचल्यावर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आले होते. तपासणी केली असता कपाटातील ८० हजार रुपयांची रोकड,

 चार तोळ्यांचा सोन्याचा राणीहार, अडीच तोळ्यांचे सोन्याचे नेकलेस आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून विविध पुरावे

 संकलित केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर धागेदोऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अलीकडे महुद परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घर बंद करून बाहेर जाताना विश्वासू शेजाऱ्यांना माहिती देणे, 

सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments