शेतात पाणी देताना शेतकऱ्याचा मृत्यू; सांगोला पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद, शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
सांगोला | प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील जवळा येथील राभोपसेवाडी परिसरात शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
झाल्याची घटना रविवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सांगोला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव राजाराम ज्ञानोबा कदम (वय ५८, रा. राभोपसेवाडी, जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे आहे. रविवारी सकाळी ते घरालगतच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.
काही वेळानंतर ते शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेत त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे हलविले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली जगदाळे यांनी तपासणी केल्यानंतर राजाराम कदम यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
त्यानंतर रुग्णालयाकडून सांगोला पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १३८/२०२६ अंतर्गत बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार बजरंग सुधाकर बोराटे करीत आहेत.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या आकस्मिक घटनेमुळे जवळा व परिसरात शोककळा पसरली असून, राजाराम कदम यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले आहे.


0 Comments