पहाटेच्या धाडीत सांगोला मार्केट यार्डातील जुगार अड्डा उद्ध्वस्त; सहा जण रंगेहात ताब्यात
सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहरातील मार्केट यार्ड परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकून मोठी कारवाई केली.
या कारवाईत "तीन पाणी" हा पत्त्यांचा जुगार खेळताना सहा जणांना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींकडून ₹७,२५० रोख रक्कम आणि दोन पत्त्यांचे संच जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार शहरात अवैध धंद्यांविरोधात विशेष गस्त सुरू होती.
त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, पोलीस हेडकॉन्स्टेबल भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राऊत आणि पोलीस कॉन्स्टेबल वसीम नजीर शेख हे मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत
असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. जर्शी गाईच्या बाजारातील गाळा क्रमांक ६ समोरील मोकळ्या जागेत
काही जण पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत तत्काळ छापा टाकला.
पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकत सहा जणांना जुगार खेळताना पकडले.
पकडण्यात आलेल्यांमध्ये कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे.
छाप्यात जप्त करण्यात आलेली रोकड व जुगाराचे साहित्य पंचांसमक्ष पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसीम नजीर शेख
यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सांगोला शहरात अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
या ताज्या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


0 Comments