शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा; शिक्षकांनी शाळेच्या वेळेत शाळेतच राहावे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे शिक्षण विभागाला निर्देश
सोलापूर, दि. १० : जिल्ह्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिले.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, विद्यार्थी पटनोंदणी, शाळांची सद्यस्थिती, मोफत गणवेश वाटप, शाळा दुरुस्ती व बांधकामे, शिक्षक समायोजन, न्यायालयीन प्रकरणे, शाळांमधील मूलभूत सुविधा तसेच विविध शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
३९ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळानिहाय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत हृदयविकाराची समस्या आढळलेल्या ३९ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी २८ विद्यार्थी मुंबई येथे उपचारासाठी जाण्यास तयार झाले आहेत.
उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी समुपदेशन करून त्यांना उपचारासाठी तयार करावे, अशा सूचना सभापती केदार सावंत यांनी दिल्या. कोणताही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक समन्वय साधून शस्त्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम
शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून सर्वेक्षणासाठी निश्चित दिवस ठरवावा आणि एकही पात्र बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सभापतींनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या उपस्थितीबाबत स्पष्ट सूचना
शाळेच्या वेळेत शिक्षकांनी विनाकारण शाळेबाहेर जाऊ नये. अध्यापनासाठी उपलब्ध असलेला वेळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे वापरला जावा आणि शाळेतील शिक्षकांची उपस्थिती सुनिश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिले.
शाळांमधील प्रलंबित कामांना गती देण्यासोबतच शासनाच्या विविध योजना वेळेत आणि प्रभावीपणे राबविणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे, शाळांमधील मूलभूत सुविधा सक्षम करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या तीनही बाबींना सर्वोच्च प्राधान्य देऊन ‘विद्यार्थीहित प्रथम’ या भूमिकेतून शिक्षण विभागाने कार्य करावे, असे आवाहन सभापती केदार सावंत यांनी केले.


0 Comments