उजनी परिसरात गांजाची शेती उघड; ७१ किलो १९ ग्रॅम गांजाची झाडे जप्त कुर्डवाडी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३५ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला : माढा तालुक्यातील उजनी (मा.) परिसरात शेतामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार कुर्डवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७१ किलो १९ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून, त्याची अंदाजे किंमत ३५ लाख ५९ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुर्डवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाला उजनी (मा.) ता. माढा परिसरातील एका शेतामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला. शेताची पाहणी केली असता गांजाची झाडे लागवड केलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून ही झाडे जप्त केली.
या कारवाईमध्ये एकूण ७१ किलो १९ ग्रॅम प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी अभिमान विठ्ठल लोकरे (वय ५३, रा. उजनी (मा.), ता. माढा,
जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०२/२०२६ अन्वये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(अ)(ii)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची धडक मोहीम
कुर्डवाडी पोलिसांच्या या कारवाईमुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतामध्येच गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याचा पोलिसांचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार, कुर्डवाडी पोलीस ठाणे करीत आहेत. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचा स्रोत, लागवडीमागील उद्देश तसेच या प्रकरणाशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याबाबत तपास यंत्रणा माहिती घेत आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि करमाळा उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कुर्डवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक पवार, सहायक पोलीस फौजदार रणदिवे,
पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे, हराळे, मोरे तसेच पोलीस अंमलदार मुलाणी, बागल, कुंभार, चापोका गात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
“अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशारा पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिला आहे.


0 Comments