अघोरी पूजेचा गंभीर आरोप; “भाच्याला जीवे मारण्यासाठी पूजा केली” — सांगोल्यात शहाजीबापूंचा खळबळजनक दावा मेळाव्यात दीपक आबांना टोला; भरत गोगावलेंकडून ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत
सांगोल्यात शिवसेना मेळाव्यात शहाजीबापूंचे खळबळजनक आरोप
सांगोला | प्रतिनिधी सांगोला येथील शिवसेना मेळाव्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या एका गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आपल्या भाच्याला निवडणुकीत पराभूत करून त्याचा जीव घेण्यासाठी अघोरी स्वरूपाची पूजा करण्यात आल्याचा गंभीर दावा शहाजीबापूंनी केला.
या कथित प्रकाराचा उल्लेख करत त्यांनी अशोक खरात यांच्यावर निशाणा साधला, तर उपस्थित अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्याकडेही सवाल उपस्थित केला.
सांगोला येथे आयोजित शिवसेना मेळाव्यास राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री योगेश कदम, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगोल्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर जोरदार टीका केली.
शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात दावा केला की, अशोक खरात यांच्यावर चित्रीत होत असलेल्या ‘महाराष्ट्रा एल्फिन्स्टन फाईल’ या चित्रपटाच्या संदर्भात एक कथित प्रकार घडला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन जवळा परिसरात पूजा करून गेल्याचा आरोप त्यांनी केला.
“माझा भाचा अतुल पवार याला निवडणुकीत पराभूत करून त्याचा जीव घेण्यासाठी पूजा करण्यात आली,” असा गंभीर आरोप शहाजीबापूंनी केला. मात्र, या कथित प्रकारामुळे आपण घाबरलो नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.
“मी माझ्या भाच्याला सांगितले, काळजी करू नकोस. तुझा मामा आहे. तू काही मरत नाहीस,” असे म्हणत शहाजीबापूंनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली.
यावेळी त्यांनी दिपाली सय्यद यांना उद्देशून, हा कथित प्रसंग अशोक खरात यांच्यावर तयार होत असलेल्या चित्रपटात घेण्यात आला आहे का, असा सवालही केला.
दीपक आबांनाही लगावला टोला
या भाषणादरम्यान शहाजीबापूंनी सांगोल्यातील राजकीय विरोधकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. अशोक खरात यांच्या कथित कारनाम्यांचा उल्लेख करत त्यांनी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधल्याने मेळाव्यात राजकीय चर्चांना उधाण आले.
“संघर्षाशिवाय आम्हाला काहीच मिळाले नाही”
सांगोला तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर बोलताना शहाजीबापूंनी आपल्या संघर्षाची आठवण करून दिली. अजित पवार यांच्या काळात सांगोल्याचे पाणी इंदापूरकडे वळविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पाणी वाचविण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची तयारी केली होती, असे सांगितले.
“आम्ही आमची भूमिका मीडियामध्ये जाहीर केल्यानंतर अजितदादांचा फोन आला. सुरुवातीला त्यांनी पाण्याबाबत वेगळी भूमिका घेतली; मात्र कागदपत्रे दाखवल्यानंतर पाणी असल्याचे मान्य करण्यात आले,” असे शहाजीबापूंनी सांगितले.
त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संपर्क साधून टोकाची भूमिका घेऊ नका, असे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. “आम्हाला कोणतीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळालेली नाही,” असेही ते म्हणाले.
राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत?
दरम्यान, या मेळाव्यात राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. महाराष्ट्रात लवकरच पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
शहाजीबापू पाटील हे सातत्याने धडपडून काम करत असून त्यांच्या कामाचे चीज होणे आवश्यक असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
“एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात, ते कुणालाही कळत नाही. लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन होणार आहे. आता सांगितले तर मीडिया लगेच बातम्या करेल,” असे म्हणत गोगावले यांनी पुढील राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर सांगोल्यासह राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबतही या मेळाव्यातून संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकीकडे अघोरी पूजेबाबतचा शहाजीबापूंचा गंभीर आरोप, तर दुसरीकडे भरत गोगावले यांनी दिलेले ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत यामुळे सांगोल्यातील शिवसेना मेळावा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.


0 Comments