सांगोल्यात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद; शासनाकडे तातडीच्या निर्णयाची मागणी तहसीलदारांना निवेदन सादर; जुन्या गॅझेट व ऐतिहासिक नोंदींच्या आधारे पात्र मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी
सांगोला प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगोला शहरासह तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध आस्थापनांनी बंदला प्रतिसाद दिल्याने दिवसभर सांगोल्यात मराठा आरक्षणाच्या मागणीचे तीव्र पडसाद उमटले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर केले.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनामध्ये पात्र व गरजू मराठा समाजबांधवांना शासकीय नोकरी तसेच आवश्यक आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच सातारा, कोल्हापूर, औंध, जत आदी भागांतील जुन्या गॅझेटमधील नोंदी व ऐतिहासिक कागदपत्रांचा विचार करून पश्चिम महाराष्ट्रातील पात्र मराठा समाजबांधवांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
शहरातील व्यवहार ठप्प
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला शहरातील बहुतांश दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. तालुक्यातील विविध गावांमधून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सांगोल्यात दाखल झाले होते.
तहसील कार्यालयात निवेदन देताना उपस्थित समाजबांधवांनी शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
सांगोल्यात पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
आता शासन या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सकल मराठा समाजासह सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments