पत्रकार किशोर म्हमाणे यांच्यावर जीवघेणा हल्ला;
‘आज जिवंत सोडायचे नाही’ म्हणत लोखंडी रॉड, काठी अन् तलवारीने मारहाण
पत्रकारावर जीवघेणा हल्ला; ‘आज जिवंत सोडायचे नाही’ म्हणत लोखंडी रॉड, काठी, चैन अन् तलवारीने मारहाण
रेल्वे बोगद्याजवळ दुचाकी अडवून पत्रकाराला बेदम मारहाण; १० ते १५ जणांच्या टोळक्याचा हल्ला असल्याचा आरोप
सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला शहरातून गावाकडे दुचाकीवरून जात असलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक
घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रेल्वे बोगद्याजवळ घडली. दुचाकी आडवी लावून पत्रकाराला अडवण्यात आले.
त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी काठी, लोखंडी चैन, तलवार व कोयत्याने मारहाण करण्यात आल्याचा
गंभीर आरोप जखमी पत्रकार किशोर कृष्णा म्हमाने यांनी आपल्या जबाबात केला आहे.
किशोर म्हमाने हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या सुमारे १५ वर्षांपासून कार्यरत असून, दैनिक किरणोदयचे संपादक म्हणून काम करतात.
हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी सांगोला येथील मोहन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
म्हमाने यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते ९ सप्टेंबर रोजी सकाळी कडलास नाक्यावरून मिरज रोडने युनिकॉर्न दुचाकीवरून गावाकडे जात होते.
रेल्वे बोगद्याखाली आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी दुचाकी आडवी लावून
म्हमाने यांना थांबवले. यावेळी संतोष लवटे याच्यासह दोन अनोळखी व्यक्ती असल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.
यानंतर आणखी काही दुचाकींवरून १० ते १५ जण घटनास्थळी आल्याचा आरोप आहे. यावेळी ‘आमचे अध्यक्ष बंडू मासाळ यांना विरोधक का करतो?’
असे म्हणत मारहाण सुरू करण्यात आल्याचे म्हमाने यांनी सांगितले.
हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, लाकडी काठी व इतर हत्यारांनी मारहाण केल्याने आपण दुचाकीवरून खाली पडलो, असे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
त्यानंतर निखिल जानकर याने लोखंडी रॉडने डोक्यात, सागर मोटे याने लाकडी काठीने डोक्यावर, तर बबन जानकर याने लोखंडी चैनने पाठीवर मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, विशाल जानकर याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला; मात्र तलवार बाजूच्या भिंतीला लागल्याचे म्हमाने
यांनी जबाबात नमूद केले आहे. धनंजय पवार याच्या हातात लोखंडी कोयता असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच धीरज काटे, अरमान शेख, दीपक, कृष्णा व्हरे व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
‘आज याला जिवंत सोडायचे नाही, संपवून टाकायचे’ अशा धमक्या देत मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप पत्रकार म्हमाने यांनी केला आहे.
यावेळी विष्णू देशमुख व अस्मीर तांबोळी घटनास्थळी आल्याने त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकींवरून पसार झाल्याचे जबाबात नमूद आहे.
जखमी अवस्थेत विष्णू देशमुख व अस्मीर तांबोळी यांनी म्हमाने यांना मोहन हॉस्पिटल, सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले.
या हल्ल्यामागे काही दिवसांपूर्वी सुभाष सुरवसे व बंडू मासाळ यांच्यासोबत झालेल्या किरकोळ वादाचा संबंध असल्याचा संशय पत्रकार म्हमाने यांनी आपल्या जबाबात व्यक्त केला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, पत्रकारावर झालेल्या या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे
सांगोला तालुक्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस तपासानंतर हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.


0 Comments