Breaking News

सांगोला नगरपरिषदेचे आवाहन: ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषद विहिरींमध्ये करू नये

सांगोला नगरपरिषदेचे आवाहन: ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपरिषद विहिरींमध्ये करू नये

सांगोला शहरामध्ये दिनांक १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रीगणेशोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

 या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी सांगोला नगरपरिषद प्रशासनाने विशेष नियमावली व उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील घरगुती व लहान गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी खालील तीन विहिरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:

१) आठवडा बाजार आतील विहीर

२) आठवडा बाजार बाहेरील विहीर

३) कुंभार गल्ली विहीर

६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींना मनाई 

        यावर्षी सांगोला शहरात पर्जन्यमान सरासरीपेक्षा खूपच कमी झाले असल्याने, प्रशासनाने निश्चित केलेल्या तिन्ही विहिरींमध्ये पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे.

 या विहिरींची एकूण क्षमता, सुरक्षितता, विसर्जनाच्या वेळी होणारी संभाव्य गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे धोके विचारात घेता, ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नगरपरिषदेच्या विहिरींमध्ये करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मंडळांना आपापल्या स्तरावर व्यवस्था करण्याचे निर्देश:

        ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेश मूर्तींची स्थापना केली आहे, 

त्यांनी नगरपरिषदेच्या विहिरींमध्ये विसर्जन न करता, आपल्या स्तरावरून इतर योग्य व सुरक्षित ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाला सहकार्य करण्‍याचे आवाहन:

        शहरातील ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी 

व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थेला अडथळा न आणणे तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक

 त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. हा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, 

असे जाहीर आवाहन सांगोला नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. "सांगोला शहर हे नेहमीच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत पुढे राहिले आहे. 

यंदाचा सण साजरा करताना आपण आपल्या निसर्गाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. १ ऑगस्ट २०२५ च्या शासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

 नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी पीओपी (POP) च्या मूर्तींऐवजी केवळ शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या मूर्तींचाच वापर करावा. 

 तरी सर्व सांगोलावासीयांनी प्रशासनाला सहकार्य करून हे सण पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत." असे आवाहन मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments