माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
सांगोला नगरपरिषदेकडून सांगोला शहरात माझी वसुंधरा अभियान 7.0 अंतर्गत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व स्वच्छ पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिक, घरगुती गणेश मंडळे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.
गणेशमूर्ती शक्यतो शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक असाव्यात, तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारा ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे,
सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे तसेच गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेने निश्चित केलेल्या विसर्जनस्थळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच गणेश मंडळांनी स्वच्छता, पाणी बचत, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवावेत.
मंडळांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखून नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रोत्साहित करावे.
“स्वच्छ सांगोला – सुंदर सांगोला” हा संदेश घेऊन सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा आदर्श निर्माण करून
सांगोला शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.


0 Comments