सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची रंगत वाढली; अतुल पवारांचा दावा मजबूत? उमेश पाटील यांच्या निकटवर्तीय म्हणून अतुल पवारांची चर्चा; विजयराज डोंगरे यांचाही दावा कायम
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पक्षांतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू
असतानाच गटनेतेपदासाठी सांगोल्याचे अतुल मालक पवार आणि मोहोळचे विजयराज डोंगरे यांनी दावा केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्यपद येणार असून, त्या नियुक्तीमध्ये अधिकृत गटनेत्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
त्यामुळे गटनेतेपद कोणाच्या पदरात पडते, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या निकटवर्तीयांमध्ये अतुल पवार यांचे नाव घेतले जाते. सांगोला तालुक्यात तळागाळात काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारा आणि पक्षसंघटनेशी जोडलेला कार्यकर्ता म्हणून पवार यांची प्रतिमा असल्याने गटनेतेपदासाठी त्यांचा दावा दिवसेंदिवस चर्चेत येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील चार सदस्य आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली,
तर माढा व करमाळा तालुक्यातील चार सदस्य माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाशी संबंधित असल्याचे राजकीय समीकरण मांडले जात आहे. मोहोळ, सांगोला आणि माळशिरस तालुक्यातूनही राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.
या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर गटनेतेपदासाठी पक्षांतर्गत समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. मोहोळचे विजयराज डोंगरे यांनीही गटनेतेपदावर आपला दावा कायम ठेवला आहे.
त्यामुळे पवार आणि डोंगरे यांच्या दाव्यांमध्ये अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे लक्ष लागले आहे.
दोन्ही बाजूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपापली भूमिका आणि कागदपत्रे सादर केल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित नियम, सदस्यांचे संख्याबळ आणि सादर झालेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर गटनेतेपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
त्यामुळे गटनेतेपद आणि स्वीकृत सदस्यपद या दोन्ही मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकीय समीकरणे, विविध गटांचे संख्याबळ आणि वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय यावर या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अधिकृत गटनेता कोण ठरतो आणि त्यानंतर स्वीकृत सदस्यपदासाठी कोणाच्या नावाची शिफारस होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments