सांगोल्यातून गावाकडे जात असलेल्या पत्रकारावर हल्ला; एखतपूरजवळ तिघांकडून मारहाण मोटारसायकल अडवून लाकडी काठी व लोखंडी पाईपने मारहाण; अज्ञात तिघांविरुद्ध तक्रार
सांगोला : सांगोला शहरातून लोटेवाडी येथे आपल्या गावी मोटारसायकलवरून जात असलेल्या पत्रकारावर
एखतपूर येथील खडी क्रेशरजवळ अज्ञात तिघांनी हल्ला केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री घडली.
या हल्ल्यात पत्रकार बबन किसन चव्हाण (वय ३०, रा. लोटेवाडी, ता. सांगोला) जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे ९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास स्प्लेंडर मोटारसायकलवरून सांगोल्याहून लोटेवाडीकडे जात होते.
एखतपूर येथील खडी क्रेशरजवळ मागून मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवली.
चव्हाण यांच्या जबाबानुसार, संबंधित तिघांनी कोणतीही विचारणा न करता सोबत आणलेल्या लाकडी काठी व लोखंडी पाईपने त्यांच्या डाव्या पायावर,
दोन्ही हातांवर, डोक्यावर तसेच उजव्या डोळ्याजवळ मारहाण केली. हल्लेखोरांना मारहाणीचे कारण विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, मागून येत असलेले गावातील शंकर भगवान सरगर यांनी घटनास्थळी येऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांच्याजवळ येण्यापूर्वीच तिन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून सांगोल्याच्या दिशेने पसार झाले.
यानंतर शंकर सरगर यांनी जखमी चव्हाण यांना खासगी वाहनातून आटपाडी येथील देवकडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सांगोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी बबन चव्हाण यांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेऊन घटनेचा तपास केला जाणे अपेक्षित आहे.
पत्रकारावर झालेल्या या हल्ल्यामुळे सांगोला तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोरांना तातडीने शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


0 Comments