महाराष्ट्राची शान ‘खिलार’ संवर्धनासाठी जुनोनीचे शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र ठरतेय केंद्रबिंदू
१९५९ पासून शुद्ध खिलार पैदास; ५९२ हेक्टर क्षेत्रात संवर्धनाचा उपक्रम — शेतकऱ्यांसाठी लिलावातून कालवडी व खोंड उपलब्ध
सांगोला : महाराष्ट्रातील पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण खिलार गोवंशाचे संवर्धन व शुद्ध पैदास करण्याच्या उद्देशाने सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
सन १९५९ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राचे एकूण क्षेत्र ५९२ हेक्टर असून त्यापैकी सुमारे २७ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे.
या प्रक्षेत्रामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शुद्ध खिलार गायींची पैदास आणि संवर्धन केले जाते. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवकुमार तुकाराम खारगे
यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. जनावरांचा चारा, शेती व्यवस्थापन आणि गाईंची देखभाल करण्यासाठी दररोज सुमारे २० ते २५ कंत्राटी कामगार कार्यरत असतात.
पाण्यामुळे पशुपैदास प्रक्षेत्राला मोठा आधार
जुनोनी पाझर तलावाला टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत पाणी उपलब्ध होत असल्याने या पशुपैदास प्रक्षेत्राला मोठा आधार मिळाला आहे. पशुधनासाठी आवश्यक चारा उत्पादन आणि परिसरातील शेती व्यवस्थापनासाठी या पाण्याचा उपयोग होतो.
सध्या प्रक्षेत्रात २८ मोठ्या खिलार गायी, ३५ गाभण जाण्यास तयार कालवडी आणि ३ खिलार खोंडे आहेत. उच्च दर्जाच्या वळूंच्या वीर्याचा वापर करून गुणवत्तापूर्ण पैदास करण्यावर भर दिला जात आहे.
शेतकऱ्यांना लिलावातून खिलार जनावरे उपलब्ध
या केंद्रातील कालवडी व खोंडांची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांना विक्री केली जाते. त्यामुळे खिलार जातीच्या चांगल्या गुणवत्तेच्या जनावरांचा शेतकऱ्यांना लाभ घेता येतो.
या केंद्रातील उच्च गुणवत्तेच्या वळूंचे महत्त्व राज्याबाहेरही अधोरेखित झाले आहे. सन २०२४-२५ मध्ये कर्नाटक शासनाला गोठीत रेत निर्मितीसाठी पाच वळू, तर सन २०२५-२६ मध्ये हरियाणा शासनाला दोन वळू देण्यात आले आहेत.
‘खिलार’ महाराष्ट्रातून नामशेष होऊ नये, हाच मुख्य उद्देश
खिलार ही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली पारंपरिक गोवंशाची जात आहे. या जातीचे अस्तित्व टिकवून ठेवणे,
शुद्ध व उच्च प्रतीच्या खिलार जनावरांची पैदास करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार जनावरे पोहोचवणे हा जुनोनी पशुपैदास प्रक्षेत्राचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीतून संस्थेच्या बळकटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भविष्यात खिलार संवर्धनाच्या कार्याला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
दीड एकरावर ‘देवराई’ची निर्मिती
५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे दीड एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड करून देवराईची निर्मिती करण्यात आली.
वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब आदी देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या प्रक्षेत्रातून देण्यात आला आहे.
बेंदूरनिमित्त खिलार संवर्धनाचा संदेश
महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात पशुधनाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राची शान असलेली खिलार जात अबाधित राहावी आणि तिचे संवर्धन पुढील पिढ्यांपर्यंत व्हावे,
यासाठी बेंदूर सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी जुनोनी येथील शासकीय पशु पैदास प्रक्षेत्राची माहिती जाणून घेऊन या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क पत्ता :
शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर.
संपर्क :
अक्षय तवाटे – ८४५९९२३२७५
बंडोपंत होनमाने – ९२७३०२२०९८ / ९३०९२८६०६०
माहिती संकलन : राजेंद्र पाटील, उपविभागीय समन्वयक, पंढरपूर एसडीओ.


0 Comments