Breaking News

सांगोल्यात प्रतिबंधित सुपारीचा मोठा साठा जप्त; अक्षय ट्रेडिंगवर FDAची धडक कारवाई ६१८ पुड्यांचा ३७ हजारांचा माल ताब्यात; साठा मालकासह गाळा मालकावर कारवाई

सांगोल्यात प्रतिबंधित सुपारीचा मोठा साठा जप्त; अक्षय ट्रेडिंगवर FDAची धडक कारवाई ६१८ पुड्यांचा ३७ हजारांचा माल ताब्यात; साठा मालकासह गाळा मालकावर कारवाई


सांगोला : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थांची विक्री करण्याच्या 

उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने सांगोल्यातील वज्राबाद पेठ येथील अक्षय ट्रेडिंग कंपनीवर कारवाई केली. 

या कारवाईत फिलिंग्स स्वीट सुपारी आणि चंदन स्वीट सुपारीचे तब्बल ६१८ पुडे, एकूण ३७ हजार ८० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम यांनी पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 

अक्षय ट्रेडिंग कंपनीची तपासणी केली. तपासणीदरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले.

कारवाईत फिलिंग्स स्वीट सुपारीचे ३७८ पुडे आढळले. प्रत्येकी ६० रुपये किंमत असल्याने त्याची एकूण किंमत २२ हजार ६८० रुपये आहे.

 तर चंदन स्वीट सुपारीचे २४० पुडे, प्रत्येकी ६० रुपये याप्रमाणे १४ हजार ४०० रुपये किमतीचा साठा आढळला. दोन्ही प्रकार मिळून ६१८ पुड्यांची किंमत ३७ हजार ८० रुपये आहे.

फिरत्या विक्रेत्याकडून माल घेतल्याची माहिती

या प्रतिबंधित सुपारीचा पुरवठा कुठून झाला, याबाबत चौकशी केली असता माल एका फिरत्या विक्रेत्याकडून घेतल्याचे सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 दरम्यान, तपासणीच्या वेळी साठा मालक अक्षय अनिल मस्के हा तेथून फरार झाल्याचेही नमूद आहे.

जप्त केलेला माल मानवी सेवनासाठी किंवा पुनर्विक्रीसाठी वापरला जाऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा ताब्यात घेतला.

 तसेच प्रत्येक प्रतिबंधित अन्नपदार्थाचा काही भाग अनौपचारिक नमुना म्हणून विश्लेषणासाठी वेगळा ठेवण्यात आला असून, संबंधित खोली पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आली आहे.

साठ्याच्या मूळ पुरवठादाराचा शोध सुरू

या प्रकरणात साठा मालक अक्षय अनिल मस्के तसेच गाळा मालक पोपट मेहबूब खाटिक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित 

तरतुदींसह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रतिबंधित अन्नपदार्थाचा मूळ मालक कोण, मालाचा मूळ पुरवठादार कोण आणि संबंधित जागेचा सध्याचा मालक कोण, 

याबाबत सखोल तपास करण्याची मागणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments