कडलासमध्ये रात्री बागेत घुसून दोन टन डाळिंब लंपास; १.६० लाखांचा माल चोरीला गोण्या भरून डाळिंब घेऊन मोटारसायकलवरून पसार झाल्याचा आरोप; दोन संशयितांविरुद्ध शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
सांगोला : कडलास (ता. सांगोला) परिसरात डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतातील डाळिंब बागेत रात्रीच्या सुमारास घुसून झाडांवरील डाळिंब तोडून गोण्यांमध्ये भरत चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेत तब्बल दोन टन डाळिंब, अंदाजे १ लाख ६० हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेल्याची तक्रार सांगोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
कडलास येथील शेतकरी श्रीनिवास बाबासाहेब माने (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी आपल्या डाळिंब बागेची पाहणी करून घर गाठले.
रात्री सुमारे ८.१० वाजता ते पुन्हा शेताकडे गेले असता बागेतील काही डाळिंब झाडाखाली पडलेले, तर अनेक झाडांवरील डाळिंब गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
संशय आल्याने त्यांनी बागेच्या शेवटच्या बाजूला पाहणी केली असता एक व्यक्ती डाळिंब तोडून गोणीत भरताना दिसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
माने त्याच्याकडे जात असतानाच आणखी एक व्यक्ती मोटारसायकलवरून तेथे आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर दोघांनी डाळिंबाने भरलेली गोणी घेऊन मेडशिंगी-कडलास रस्त्याच्या दिशेने धूम ठोकल्याचा आरोप आहे.
माने यांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी कडलास-मेडशिंगी रस्त्यावर प्रथमेश बापू गायकवाड यांची भेट झाली. मोटारसायकलवरून गेलेल्या व्यक्तींबाबत विचारणा केली
असता त्यांची नावे रोहन दत्तात्रय माने आणि सिताराम विठ्ठल आलदर, दोघेही रा. कडलास, असल्याचे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, माने यांच्या शेजारील शेतकरी सुनील शिवाजी वाघ यांच्या शेतातूनही मागील दहा दिवसांपासून डाळिंब चोरीस जात असल्याचे समजल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी श्रीनिवास माने यांनी संबंधित दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चोरीस गेलेल्या डाळिंबांचे
वजन अंदाजे दोन टन आणि किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले आहे. घटनेचा पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.


0 Comments