Breaking News

टाकळी बायपासवर पोलिसांनाच धडक! आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला वाहनाने फरपटत नेल्याचा आरोप

टाकळी बायपासवर पोलिसांनाच धडक! आरोपींना


पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला वाहनाने फरपटत नेल्याचा आरोप

पंढरपूर : तपासावरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिस पथकासमोरच धक्कादायक प्रकार घडला.

 पोलिसांनी वाहन थांबवल्यानंतर तपासासाठी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितल्याचा राग आल्याने 

दोन जणांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरच वाहन घातल्याचा आरोप आहे.

 या घटनेत संबंधित पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, वाहनाने त्याला काही अंतर फरपटत नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस कर्मचारी विशाल चंद्रकांत भोसले हे पोहेकॉ येडगे व पोकॉ राऊत

 यांच्यासह तपासावरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी टाकळी बायपास परिसरात गेले होते.

यावेळी पोलिसांचे वाहन पाहताच समाधान दुधाळ (रा. सावे, ता. सांगोला) आणि सोमनाथ हाके (रा. मांजरी, ता. सांगोला)

 यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनातून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पाठलाग करून त्यांचे वाहन थांबविले.

त्यानंतर विशाल भोसले हे वाहनातून खाली उतरून दोघांना तपासाच्या कामासाठी सांगोला पोलीस ठाण्यात येण्यास सांगत होते. 

याचवेळी दोघांनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील वाहन भोसले यांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. 

वाहनाची धडक बसल्यानंतर भोसले यांना काही अंतर वाहनासोबत फरपटत नेण्यात आल्याने ते जखमी झाले.

या झटापटीत पोलिसांचे वाहन तसेच आरोपींच्या वाहनाचेही नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 पोलिसांच्या अंगावरच वाहन घातल्याच्या या प्रकारामुळे टाकळी बायपास परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १३२, ३२४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.४४ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांनी केली असून, 

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

0 Comments