Breaking News

सोलापूरच्या ११ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट; शासनाकडून मोठ्या सवलतींची घोषणा!

सोलापूरच्या ११ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट; शासनाकडून मोठ्या सवलतींची घोषणा! 


२६५ तालुक्यांत ‘Trigger-1’ लागू; शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसह विविध उपाययोजना

सोलापूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

या तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

 यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दुष्काळाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. 

रोजगाराच्या दृष्टीनेही महत्त्वाची पावले उचलण्यात आली असून, रोहयोच्या कामांसाठी निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.

पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागात आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली जाणार आहे. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मजुरांना बसू नये यासाठी अन्नधान्याची उपलब्धता, 

जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जलसंधारणाची कामेही सुरू करण्यात येणार आहेत.

पीक नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र निर्णय

दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत या निर्णयातून तत्काळ जाहीर झालेली नाही. 

२६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सवमती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२ या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळी उपाययोजनांच्या कक्षेत आले आहेत.

 त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी शासनाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments