लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींची तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दमदार कामगिरी
१७ व १४ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार पात्रता
सांगोला : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १७ वर्षे वयोगट तसेच १४ वर्षे वयोगटातील खो -खो स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
दोन्ही वयोगटातील संघांनी अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांवर मात करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
१७ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने कटफळ संघाचा एक डाव व १७ गुणांनी पराभव करत तालुकास्तरीय खो -खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयासह लक्ष्मीनगर विद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच लक्ष्मीनगरच्या खेळाडूंनी आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. बचाव आणि चढाईमध्ये उत्कृष्ट समन्वय साधत संघाने दिमाखदार विजय मिळवला.
१४ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यातही लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयाच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. अंतिम सामन्यात लक्ष्मीनगरच्या संघाने शिवणे
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघाचा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला. या विजयामुळे १४ वर्षे वयोगटातील लक्ष्मीनगरचा संघदेखील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
या दोन्ही संघांच्या यशामुळे लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थिनींनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयातील शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींकडून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
या यशामागे मार्गदर्शक राकेश पवार सर व विजयकुमार गोडसे सर, तसेच क्रीडा शिक्षक अशोक नरळे सर आणि दत्तात्रय बेंदगुडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सामना सुरू असताना जानकर सर, कोरे सर आणि विजय टिंगरे सर उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्याने आता जिल्हास्तरावरही लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत.
या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
.jpg)

0 Comments