सांगोल्यात सील केलेले पानमसाला दुकान पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न?; ‘राजमाता पानमसाला स्टोर्स’वर FDAची पुन्हा कारवाई
सांगोला : प्रतिबंधित पानमसाला व अन्य अन्नपदार्थांच्या साठवणूक-विक्रीप्रकरणी यापूर्वी सीलबंद करण्यात आलेल्या
सांगोल्यातील ‘राजमाता पानमसाला स्टोर्स’चे प्रशासनाने लावलेले सील गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पंचांसमक्ष दुकानाची पाहणी करून ते पुन्हा सीलबंद केले.
या प्रकरणी दोन जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
धनगर गल्ली, मदने मेडिकलजवळील मे. राजमाता पानमसाला स्टोर्सवर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व विक्री आढळून आल्याने अन्न सुरक्षा विभागाने यापूर्वी कारवाई केली होती.
अन्न सुरक्षा अधिकारी उ. सि. भुसे यांनी २६ मार्च २०२६ रोजी सदर दुकान सीलबंद केले होते.
दरम्यान, दुकान सीलमुक्त करण्यासाठी संबंधितांकडून सांगोला येथील प्रथम वर्ग
न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर अन्न सुरक्षा विभागाने आपले म्हणणेही सादर केले होते.
पाहणीवेळी सीलच गायब
अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम हे पंचांसह दुकानाची पाहणी करण्यासाठी गेले असता दुकान कुलूप लावून बंद असल्याचे आढळले.
मात्र, प्रशासनाने पूर्वी लावलेले सील दुकानावर कुठेही दिसून आले नाही.
त्यामुळे सील काढण्यात आले अथवा त्याच्याशी छेडछाड करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच दुकानाचा व्यवसाय पुन्हा सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित व्यक्तीशी संपर्काचा प्रयत्न
या प्रकरणातील साठा मालक निशांत उर्फ टिल्लू महादेव मिसाळ यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. संबंधित पेढीची अन्न नोंदणी रद्द करण्याचे आदेश असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले.
पंचांसमक्ष दुकान पुन्हा सीलबंद
सील गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने पंचांसमक्ष दुकानाचा पंचनामा केला.
त्यानंतर दुकान पुन्हा सीलबंद करण्यात आले. कारवाईचे फोटो घेऊन पंचनामा तसेच संबंधित कागदपत्रे पोलिस ठाण्यात सादर करण्यात आली.
दोन जणांविरुद्ध फिर्याद
या प्रकरणी साठा मालक निशांत उर्फ टिल्लू महादेव मिसाळ (वय ३२, रा. सणगर गल्ली, सांगोला) आणि पेढी मालक व अन्न नोंदणीधारक
योगेश महादेव मिसाळ (रा. धनगर गल्ली, सांगोला) यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करून सील काढणे किंवा त्याच्याशी छेडछाड करणे तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांबाबतच्या आदेशांचा भंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(१), ६०, ६३ व ५५ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ व ३(५) अन्वये कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे सांगोला शहरातील प्रतिबंधित पानमसाला व अन्य अन्नपदार्थांच्या विक्री-वित्रीविरोधातील मोहिमेला पुन्हा वेग आला
असून, सीलबंद केलेल्या आस्थापनांमध्ये विनापरवानगी व्यवसाय करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


0 Comments