Breaking News

फाटा क्रमांक ५ला उद्यापासून पाणी; न आल्यास शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरण्याचा नाईक-निंबाळकरांचा इशारा

फाटा क्रमांक ५ला उद्यापासून पाणी; न आल्यास शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरण्याचा नाईक-निंबाळकरांचा इशारा


सांगोला : नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक ५च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अखेर निर्णायक टप्प्यावर आला आहे. 

अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवार, १८ ऑगस्टपासून फाटा क्रमांक ५ला पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

मंगळवारी पाणी सोडण्याची कार्यवाही झाली नाही, तर जास्तीत जास्त बुधवारपर्यंत प्रतीक्षा करू; त्यानंतर स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करणार, असा स्पष्ट इशाराही नाईक-निंबाळकर यांनी दिला.

फाटा क्रमांक ५ला पाणी सोडण्याबाबत यापूर्वी २३ ऑगस्टचे नियोजन सांगण्यात आले होते. त्यानंतर १९ ऑगस्टची तारीख अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानाच नाईक-निंबाळकर यांनी नीरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला.

सध्या कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी सुरू असून, फाटा क्रमांक ५च्या लाभक्षेत्रालाही मंगळवारपासून पाणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी फाटा क्रमांक ५च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात भजन, भक्तीजागर अशा माध्यमातून शेतकरी प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत.

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी सोडा’

फाटा क्रमांक ५च्या शेतकऱ्यांची भूमिका आता स्पष्ट आहे—आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी हवे. कालव्याचे अस्तरीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत झाले. हे बचतीचे आणि नियोजित पाणी लाभक्षेत्राला मिळाले पाहिजे, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होते का, याकडे संपूर्ण फाटा क्रमांक ५च्या लाभक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

“मंगळवार किंवा जास्तीत जास्त बुधवारपर्यंत पाणी निश्चितपणे मिळेल. पाणी न मिळाल्यास मी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करणार,” असा ठाम इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.

Post a Comment

0 Comments