म्हैसाळचे पाणी घेरडी परिसराला मिळावे; मागणीसाठी चौघांचे आमरण उपोषण
सांगोला : म्हैसाळ योजनेतून घेरडी परिसरातील घेरडी-पारे तलाव, अन्य तलाव तसेच बंधारे पाण्याने भरून द्यावेत, या मागणीसाठी घेरडी परिसरातील चार शेतकरी
दि. १७ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत त्यांनी सांगोला तहसीलदार तसेच म्हैसाळ योजना प्रशासनाला निवेदन दिले आहे.
म्हैसाळ योजनेत घेरडी परिसरातील घेरडी-पारे तलाव, अन्य तलाव व सर्व बंधारे भरण्याची तरतूद आहे. मात्र, म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे
वारंवार मागणी करूनही अद्याप पाणी सोडण्यात आले नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे घेरडी परिसराला तातडीने पाणी मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
घेरडी परिसरात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाऊस न पडलेल्या तालुक्यांना पुरेसे पाणी देण्याचे शासनाचे आदेश असतानाही सांगोला तालुक्यास अपेक्षित पाणी मिळाले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या आदेशानुसार घेरडी परिसराला पुरेसे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांनी तहसीलदार तसेच म्हैसाळ योजना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र, त्यानंतरही घेरडी परिसराला पाणी मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दोन दिवसांच्या आत म्हैसाळ योजनेतून पुरेसे पाणी सोडून सर्व तलाव व बंधारे भरून द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी
निवेदनानुसार आमरण उपोषण करणाऱ्यांमध्ये
1. श्री. व्याजी बिरा लवटे
2. श्री. अनिल तानाजी मोटे
3. श्री. भाऊसो काकासो यमगर
4. श्री. आप्पासो कोंडीबा सरगर
यांचा समावेश आहे.
या निवेदनाची माहिती म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. २, सांगलीचे कार्यकारी अभियंता तसेच म्हैसाळ कालवा क्र. ९, सांगोलाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनाही देण्यात आली आहे.
घेरडी परिसरातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


0 Comments