सांगोल्याच्या एस.टी. ताफ्यात पाच नव्या बस; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला : प्रतिनिधी सांगोला बस स्थानकाच्या ताफ्यात आणखी पाच नवीन बसगाड्या दाखल झाल्याने तालुक्यातील विद्यार्थी, ग्रामीण भागातील प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नवीन बसगाड्यांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी, प्रवासी व नागरिकांच्या हस्ते नवीन बसगाड्यांचे पूजन करण्यात आले.
सांगोला तालुक्यात ग्रामीण भागातून शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत काही मार्गांवर बसगाड्यांची कमतरता जाणवत होती. विशेषतः विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत
नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ. देशमुख यांनी एस.टी. महामंडळ तसेच राज्य शासनाकडे नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सांगोला आगाराच्या ताफ्यात पाच नवीन बसगाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील विविध मार्गांवर बससेवा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, एस.टी. बससेवा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी, महिला, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. नवीन बसगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल.
तालुक्यात ज्या मार्गांवर अद्याप बसगाड्यांची आवश्यकता आहे, त्या मार्गांचा आढावा घेऊन तेथे बससेवा वाढविण्यासाठी पुढील काळातही पाठपुरावा केला जाईल,
असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. बसगाड्यांची नियमित देखभाल, वेळापत्रकाचे काटेकोर पालन आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा मिळणे यालाही प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नवीन पाच बसगाड्या उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून, सांगोला तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आगार व्यवस्थापक अंकुशराव सलगर, स्थानक प्रमुख पंकज तोंडे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, नगरसेवक इंजिनिअर रमेश जाधव, विजय राऊत, रमेश अनुसे यांच्यासह पालक, विद्यार्थी, प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : ‘गरज असलेल्या मार्गांवर बससेवा वाढविणार’
सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व सुरक्षित बससेवा मिळावी, यासाठी नवीन बसगाड्यांची मागणी करण्यात आली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाच नवीन बसगाड्या सांगोल्याला मिळाल्या आहेत.
ज्या मार्गांवर अद्याप बससेवेची आवश्यकता आहे, त्या ठिकाणीही बसगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळात पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.
– आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख


0 Comments