हुतात्मा महादेव शिंदे स्मारक ठरावे तरुणाईच्या राष्ट्रप्रेमाचे प्रेरणास्थान; पालकमंत्री जयकुमार गोरे बलवडी येथे शौर्यस्मारकाचे दिमाखात अनावरण; हुतात्मा भवनासाठी ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा
सांगोला / तालुका प्रतिनिधी : देशाच्या सीमेचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा महादेव आनंदा शिंदे यांच्या स्मृतींना बलवडी येथे भव्य स्मारकाच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला.
तब्बल ५९ वर्षांनंतर उभारण्यात आलेले हे स्मारक सांगोला तालुक्यातील युवकांसाठी देशसेवा, त्याग आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
बलवडी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते हुतात्मा महादेव शिंदे यांच्या शौर्यस्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्मारक परिसरात हुतात्मा भवन उभारण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.
गावकऱ्यांनी एकजुटीने उभारलेल्या या स्मारकातून पुढील पिढ्यांना देशासाठी त्याग करण्याची प्रेरणा मिळेल, असे सांगत गोरे यांनी हुतात्मा महादेव शिंदे यांच्या कुटुंबाच्या त्यागाचे विशेष कौतुक केले.
वीरमाता पद्मिनी आई शिंदे यांनी कुटुंबाला दिलेले बळ आणि देशासाठी केलेला त्याग हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सैनिकाची सेवा संपते; देशप्रेम मात्र कायम राहते
ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता सीमेवर देशाचे रक्षण करणारा सैनिक हा राष्ट्राचा महत्त्वाचा घटक आहे. सैनिकाची सेवा संपल्यानंतरही त्याच्या मनातील देशप्रेम कधीच संपत नाही.
हुतात्मा महादेव शिंदे यांच्या कुटुंबाने देशासाठी केलेला त्याग समाजाने कायम स्मरणात ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले.
यावेळी मान नदीत पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न तसेच पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
शिंदे-साळुंखे कुटुंबाचे ऋणानुबंध कायम राहणार
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी हुतात्मा महादेव शिंदे आणि ह.भ.प. स्व. शारदाताई साळुंखे पाटील यांच्यातील बहीण-भावाचे नाते अधोरेखित केले. या कौटुंबिक ऋणानुबंधाची परंपरा पुढेही कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
मान नदीत पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता परिसरातील वीज आणि पोलीस स्टेशनचा प्रश्नही त्यांनी सोडवावा, अशी अपेक्षा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.
स्मारकामुळे सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बलवडी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले. हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक उभारून ग्रामस्थांनी इतिहास
आणि शौर्याची जपणूक केली असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे अनावरण होणे ही संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य संभाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. वीरमाता पद्मिनी आई शिंदे तसेच सुभेदार राजेंद्र धायगुडे यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. भजनी मंडळ आणि गजी ढोलच्या पारंपरिक वादनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
माजी सरपंच विजयदादा शिंदे यांनी स्मारक उभारणीसाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांच्या सहकार्याने समाधीस्थळ उभारण्यात आल्याने ग्रामस्थांचे ऋण कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, भाजपा नेते बाळासाहेब एरंडे, शिक्षण सभापती चेतनसिंह केदार, सभापती पूनमताई इंगोले, जि.प. सदस्य शोभाताई खटकाळे,
माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, माजी सभापती संभाजीतात्या आलदर, सचिन देशमुख, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, आरपीआय अध्यक्ष खंडू सातपुते, डॉ. शिवराज भोसले, मच्छिंद्र मामा इंगोले,
युवा नेते उल्हासदादा धायगुडे, अमरदादा लिगाडे, पोपटराव गडदे, प्रशांत वलेकर, चेअरमन संजय धायगुडे, चेअरमन शिवाजी शिंदे, नगरसेवक बाळासाहेब झपके, सरपंच ज्ञानेश्वर राऊत,
उपसरपंच शिवाजी शिंदे, समाधान शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, शिक्षक नेते रमेश शिंदे, माजी सैनिक, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षक तात्यासो शिंदे यांनी केले, तर आभार माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


0 Comments