Breaking News

सांगोल्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा उद्रेक; ओबीसी तालुकाध्यक्ष महालिंग पाटणे यांचा राजीनामा

सांगोल्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा उद्रेक; ओबीसी तालुकाध्यक्ष महालिंग पाटणे यांचा राजीनामा


सांगोला : काँग्रेस पक्षाच्या सांगोला तालुक्यातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले असून, पक्षाचे ओबीसी तालुकाध्यक्ष महालिंग पाटणे यांनी आपल्या पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. 

पक्षातील निर्णयप्रक्रिया, निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणारी वागणूक आणि काही व्यक्तींना दिले जाणारे महत्त्व यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत प्रा. पी.सी. झपके यांची निवड झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील काही निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचा दावा पाटणे यांनी केला आहे.

 या निर्णयामुळे तालुक्यात काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला असून, काही पदाधिकारीही राजीनामा देण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप

पाटणे यांनी राजीनामा पत्रातून पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. 

संघटनात्मक निर्णय घेताना स्थानिक कार्यकर्त्यांची मते विचारात न घेता काही विशिष्ट व्यक्तींच्या सल्ल्याने निर्णय होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरपालिका निवडणुकीतील एबी फॉर्मचा मुद्दा ऐरणीवर

सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या ११ उमेदवारांच्या एबी फॉर्मचा मुद्दाही पाटणे यांनी उपस्थित केला आहे.

 संबंधित उमेदवारांनी एबी फॉर्मची मागणी केली होती; मात्र त्यांना ते देण्यात आले नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

यासंदर्भात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजकुमार पवार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यात वादावादी झाल्यानंतर सांगोल्यात येऊन एबी फॉर्म देण्याबाबत कळविण्यात

 आल्याचे पाटणे यांनी सांगितले. त्यानंतर सांगोला विद्यामंदिर येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुकाध्यक्ष अजयसिंह इंगवले व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढण्याची तयारी

स्वतः प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक होतो; मात्र पक्षांतर्गत घडामोडींमुळे आपल्याला एबी फॉर्म मिळाला नसल्याचा दावा पाटणे यांनी केला आहे.

प्रा. पी.सी. झपके यांच्याबाबतही पाटणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या उपस्थितीत निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संवादाचा संदर्भ देत, 

आपल्या मुलाला भाजपकडून नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळणार असल्याने काँग्रेसचा एबी फॉर्म घेणार नसल्याची भूमिका झपके यांनी घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर पक्षात काम कशासाठी?”

“निष्ठावंत कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत असेल आणि भाजपला मदत करणाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याने तालुका व शहरातील काँग्रेस चालवली जाणार असेल, 

तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याला अर्थ काय?” असा सवाल महालिंग पाटणे यांनी उपस्थित केला.

यापूर्वी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मत भाजपच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकून मदत करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. त्या वेळी संबंधित उमेदवार एका मताने विजयी झाल्याचे पाटणे यांनी नमूद केले.

वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करूनही निर्णय न झाल्याचा दावा

पक्षातील या अंतर्गत घडामोडींची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पाटणे 

यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवर विषय मांडूनही अपेक्षित बदल झाला नसल्याने अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ

महालिंग पाटणे यांच्या राजीनाम्यामुळे सांगोला तालुक्यातील काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाटणे यांनी केलेल्या आरोपांवर संबंधित काँग्रेस पदाधिकारी अथवा प्रा. पी.सी. झपके यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर या प्रकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments