सांगोला-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर कार बंद पडली अन् कुटुंबावर चाकू-रॉडने हल्ला; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या टोळीने १.०४ लाखांचा ऐवज लुटला
मंगळवेढा : सांगोला-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर कचरेवाडी हद्दीतील बोगदा फाट्याजवळ मंगळवारी रात्री थरारक लुटमारीची घटना घडली. कार बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या
कुटुंबाला काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या चोरट्यांनी चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवत मारहाण केली. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
मरवडे येथील अक्षय भिमराव जावीर (वय २९) हे आई-वडिलांसह कार क्रमांक MH 13 AC 1356 मधून सांगोल्याकडून मंगळवेढामार्गे मरवडेकडे जात होते.
रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास कचरेवाडी परिसरातील बोगदा फाट्याजवळ त्यांची कार अचानक बंद पडली. त्यामुळे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.
याचवेळी मागून आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून तीन अनोळखी इसम खाली उतरले. त्यांनी जावीर कुटुंबाला चाकू आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत दमदाटी सुरू केली. यावेळी झालेल्या झटापटीत अक्षय जावीर आणि त्यांच्या आईला दुखापत झाली.
चोरट्यांनी जावीर कुटुंबाकडील ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले (झुबे) आणि ४ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला.
दरम्यान, महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांना संशयास्पद प्रकार दिसल्याने त्यांनी आपली वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली. नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच हल्लेखोरांपैकी तिघे घटनास्थळावरून पसार झाले. तर त्यांचा स्कॉर्पिओ चालक वाहन घेऊन सोलापूरच्या दिशेने फरार झाला.
या घटनेप्रकरणी अक्षय जावीर यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 733/2026 अन्वये BNS 2023 मधील कलम 309(4), 309(6) व 3(5) नुसार चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे पुढील तपास करीत आहेत. महामार्गावरील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.


0 Comments