Breaking News

सांगोला शहराच्या हरित भविष्यासाठी नगरपरिषदेचा वृक्षलागवडीचा संकल्प

सांगोला शहराच्या हरित भविष्यासाठी नगरपरिषदेचा वृक्षलागवडीचा संकल्प


सांगोला : वाढते शहरीकरण, तापमानातील वाढ आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 

‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत सांगोला नगरपरिषदेने शहरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षलागवड उपक्रम हाती घेतला आहे.

मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) जुना पारे रोड येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले तसेच नागरिकांच्या उपस्थितीत

 वृक्षलागवड करण्यात आली. शहरातील उपलब्ध मोकळ्या जागा, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांच्या कडेला टप्प्याटप्प्याने वृक्षलागवड करण्याचे नियोजन नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, ‘झाडे लावण्यापेक्षा ती जगविणे महत्त्वाचे’ या भूमिकेतून लागवड केलेल्या रोपांच्या संगोपनावर नगरपरिषदेने भर दिला आहे. रोपांना नियमित पाणीपुरवठा, संरक्षण आणि आवश्यक देखभाल केली जाणार आहे.

वृक्षसंवर्धनामुळे प्रदूषण नियंत्रण, तापमान कमी ठेवणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि जैवविविधतेचे संरक्षण यास मदत होते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी बनावी, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी या उपक्रमासाठी प्रयत्नशील असून, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासोबतच स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक सांगोला घडविण्यावर भर दिला जात आहे.

उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून वृक्षलागवडीची ही मोहीम व्यापक चळवळ बनविण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे.

‘स्वच्छ सांगोला – सुंदर सांगोला – हरित सांगोला’ या संकल्पनेला बळ देत पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य पर्यावरणीय भेट आहे.”

Post a Comment

0 Comments