Breaking News

अकलूज पोलिसांचा शस्त्रसाठ्यावर मोठा घाला; १७ गावठी पिस्तूल अन् ४७ जिवंत काडतुसे जप्त सांगोल्यातील काही जण..

अकलूज पोलिसांचा शस्त्रसाठ्यावर मोठा घाला; १७ गावठी पिस्तूल अन् ४७ जिवंत काडतुसे जप्त सांगोल्यातील काही जण..


अकलूज : अकलूज ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रविक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १७ देशी बनावटीची पिस्तूल आणि ४७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 

या कारवाईत सहा संशयितांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टेंभुर्णी रस्त्यावर काही तरुण देशी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अकलूज ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. 

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. यावेळी विकास कैलास वजाळे (३१, रा. पारिते, ता. माढा) याला कारसह ताब्यात घेण्यात आले.

विकास वजाळे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणखी पाच संशयितांना अटक केली. 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल सतीश माने (३४, रा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (३०, रा. करकंब, ता. पंढरपूर), विजय सदाशिव करणगी 

(४५, रा. शिवपूर, ता. अथणी, जि. बेळगाव), अनिल पंचलाल मेहता (३२, रा. रांजणगाव, ता. वरला, जि. वडवान, मध्य प्रदेश) आणि सुमीत नाना लवटे (१९, रा. भुईटे वस्ती, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणातील प्रदीप पांडुरंग माने (रा. चिकमहूद, ता. सांगोला) आणि शनी भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा) हे दोघे अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक केलेल्या संशयितांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आल्याने

 या शस्त्रसाठ्यामागे नेमके कोणाचे जाळे आहे, शस्त्रे कुठून आणली जात होती आणि ती कोणाला विकली जाणार होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे आणि पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या पथकाने केली.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त झाल्याने 

अकलूज पोलिसांच्या या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात असून, शस्त्रविक्रीच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाला वेग आला आहे.

Post a Comment

0 Comments