Breaking News

 तळलेले तेल पुन्हा वापरणाऱ्यांनो सावधान! खाद्यतेल विक्रीवर कडक नियम; उल्लंघन केल्यास लाखोंचा दंड अन् कठोर शिक्षेचा इशारा



मुंबई : दूध, पनीर, हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि रस्त्यावरील खाद्यविक्रीतील भेसळीविरोधात कारवाई सुरू असतानाच आता अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेलाच्या वापरावरही कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. 

‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाबाबत महत्त्वाच्या नियमांची माहिती देत विक्रेते आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना गंभीर इशारा दिला आहे.

अन्नतेलाच्या दर्जाची तपासणी करताना अनेक ठिकाणी अनियमितता आणि भेसळीचे प्रकार आढळून आल्याचे मुंढे यांनी सांगितले. राज्यात नोंदणी नसलेल्या खाद्यतेल उत्पादक कंपन्या कार्यरत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

 विशेषतः मोहरीच्या तेलामध्ये अनधिकृत मिश्रण करणे तसेच मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करण्यासारखे प्रकार आढळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी
नव्या नियमांनुसार महाराष्ट्रात आता खाद्यतेलाची सुट्या स्वरूपात विक्री करता येणार नाही. खाद्यतेल केवळ योग्य पॅकेजिंगमध्येच विकावे लागणार आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही हा नियम लागू राहणार आहे.

मोहरीचे तेल विकताना ते शंभर टक्के मोहरीचेच असणे आवश्यक असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत मिश्रण करता येणार नाही.

तेलाचे डबे पुन्हा वापरण्यावरही आक्षेप
खाद्यतेलासाठी वापरलेले टिनचे डबे पुन्हा वापरण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत 

असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या पुनर्वापराबाबत नियम असतानाही त्याचे उल्लंघन होत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
तळणीचे तेल वारंवार वापरणाऱ्यांना इशारा

हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच घरगुती वापरामध्ये एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार वापरण्याचे प्रकार आढळतात. अशा तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तळणीचे तेल वारंवार वापरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नियम मोडल्यास कठोर कारवाई
खाद्यतेलामध्ये भेसळ करणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणे यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

भेसळीच्या प्रकरणात १० लाख रुपयांपर्यंत दंड, तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांनाही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत—

सुटे खाद्यतेल खरेदी करू नका.
पॅकेज्ड तेल घेताना लेबल व्यवस्थित तपासा.
पॅकेट किंवा बाटलीचे सील सुरक्षित आहे का ते पाहा.
उत्पादनाची आणि एक्सपायरी तारीख तपासा.

तळणीचे तेल वारंवार घरी वापरू नका.
हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून वारंवार वापरलेले तेल वापरले जात असल्याचा संशय असल्यास अशा ठिकाणी खाद्यपदार्थ खाणे टाळा.

खाद्यतेलातील भेसळ आणि नियमबाह्य वापराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, विक्रेते आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments