सांगोल्यात पोलिसांची मोठी कारवाई; कारमधून तीन तलवारी, चाकू अन् बेसबॉल स्टिक जप्त
महाविद्यालय परिसरात दंगा करण्याच्या संशयावरून पाच तरुण ताब्यात; सोशल मीडिया वादातून आल्याचा पोलिसांचा अंदाज
सांगोला : महाविद्यालय परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या ताब्यातील विना नंबरप्लेटच्या टाटा टिगोर कारची झडती घेतली असता तीन तलवारी, एक चाकू आणि बेसबॉल स्टिक अशी घातक हत्यारे आढळून आली.
पोलिसांनी कारसह सर्व हत्यारे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे सांगोला शहरात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता सांगोला महाविद्यालयाजवळील कडलास रोड परिसरात करण्यात आली.
पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन कुबेर भोसले हे कर्तव्यावर असताना त्यांना महाविद्यालय परिसरात काही जणांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी पोलीस नाईक शेख व पोलीस कॉन्स्टेबल शेख यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पाच तरुण मोठमोठ्याने आरडाओरड व शिवीगाळ करताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.
चौकशीदरम्यान अविनाश रणखांबे याचा ‘कट्टे’ नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडिया तसेच फोनवरून वाद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या संदर्भात सांगोल्यात आल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या विना नंबरप्लेट टाटा टिगोर कारची तपासणी केली असता त्यामध्ये तीन तलवारी, एक चाकू आणि बेसबॉल स्टिक आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी वाहनासह ही घातक हत्यारे ताब्यात घेतली.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भोसले यांच्या फिर्यादीनुसार अविनाश विठ्ठल रणखांबे (रा. गणेशगाव, ता. माळशिरस), शिवराज संजय काळे (रा. गणेशगाव, ता. माळशिरस), अभिषेक सुभाष जाधव (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे),
प्रेम महेंद्र चव्हाण (रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि संकेत महादेव बोरावके (रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण दंगा करण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते आणि घातक हत्यारे जवळ बाळगून होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(४), भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास सांगोला पोलीस करीत असून, सोशल मीडिया वादाचे नेमके कारण आणि हत्यारे कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याबाबत तपास सुरू आहे.


0 Comments