Breaking News

अल्पवयीन मुलीच्या जबाबानंतर सांगोला पोलिसांची कारवाई; नाशिक पोलिसांकडे तपासाची सूत्रे

अल्पवयीन मुलीच्या जबाबानंतर सांगोला पोलिसांची कारवाई; नाशिक पोलिसांकडे तपासाची सूत्रे


सांगोला : अल्पवयीन मुलीला लग्नाच्या उद्देशाने नाशिकहून सांगोला तालुक्यातील 

मानेगाव येथे आणल्याच्या प्रकरणात सांगोला पोलिसांनी महत्त्वाची प्राथमिक कायदेशीर कार्यवाही केली आहे.

 बाल समितीच्या समुपदेशनानंतर मुलीने स्वतः कायदेशीर तक्रार देण्याची तयारी दर्शविल्यानंतर पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदविला. 

प्रकरणातील मूळ घटना नाशिक शहर परिसरातील असल्याने संबंधित कागदपत्रे पुढील तपासासाठी नाशिक शहर पोलिसांकडे पाठविण्यात आली आहेत.

पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबानुसार, १७ वर्षे ८ महिने वयाची मुलगी १० ऑगस्ट रोजी आईसोबत देवदर्शनासाठी नाशिक येथे गेली होती.

 दुसऱ्या दिवशी माधव कारभारी वाघ याच्याशी तिची व तिच्या आईची भेट झाली. मुलीच्या आईला पैशांचे आमिष दाखवून 

मुलीला काही काळासाठी सोबत पाठविण्यास सांगितल्याचा आरोप मुलीने केला आहे.

यानंतर मुलीला नाशिकमधील एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे आपले खरे नाव सांगू नये, तसेच एका महिलेला आई आणि एका व्यक्तीला मामा म्हणून सांगावे, 

असे सांगण्यात आल्याचे मुलीने जबाबात नमूद केले आहे. अंजना राजेंद्र देवरे आणि राहुल गबा शेळके यांची नावेही तिच्या जबाबात आली आहेत.

नाशिक न्यायालय परिसरात काही कागदपत्रे तयार करण्यात आली असून त्यावरील मजकूर आपल्याला समजावून सांगण्यात आला नसल्याचे मुलीने सांगितले. 

चुकीच्या नावाने आपली सही घेण्यात आल्याचाही आरोप तिने केला आहे.

यानंतर मुलीला वाहनातून सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे आणण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मानेगाव येथे 

पोहोचल्यानंतर तिने आपल्या खऱ्या आईला फोन करून आपण मानेगाव येथे असल्याची माहिती दिली.

लग्नासाठी आणल्याचा आरोप

मानेगाव येथे आल्यानंतर आपले लग्न अमोल दादा कदम यांच्यासोबत लावून देण्याच्या उद्देशाने आपल्याला आणण्यात आल्याचे समजल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. 

तसेच यासाठी माधव वाघ याने दोन लाख रुपये घेतल्याची माहिती मिळाल्याचेही तिने जबाबात नमूद केले आहे.

मात्र, आपले वय कमी असल्याने लग्न करण्याची इच्छा नसल्याचे मुलीने स्पष्ट केले. 

मानेगाव येथील संबंधित व्यक्तींनी आपल्याशी गैरप्रकार केला नसल्याचे आणि त्यांच्याविरुद्ध आपली तक्रार नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

बाल समितीच्या समुपदेशनानंतर मुलीचा महत्त्वाचा निर्णय

मुलीला सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर तिची काळजी घेण्यात आली. त्यानंतर सोलापूर बाल समितीचे अध्यक्ष सय्यद साहेब आणि ॲड. सुवर्णा कोकरे यांनी तिचे समुपदेशन केले.

 समुपदेशनादरम्यान मुलीला तिचे कायदेशीर अधिकार आणि तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.

यानंतर मुलीने स्वतः कायदेशीररीत्या फिर्याद देण्याची तयारी दर्शविल्याने सांगोला पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदविला. 

तिच्या जबाबाच्या आधारे संबंधित कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

तपास आता नाशिक पोलिसांकडे

प्रकरणातील प्रमुख घटना नाशिक शहर परिसरात घडल्याचे समोर आल्याने

 सांगोला पोलिसांनी प्राथमिक कार्यवाही पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याकडे पाठविली आहेत.

 त्यामुळे नाशिकमधील कथित घटनास्थळे, कागदपत्रांची निर्मिती, पैशांचा कथित व्यवहार आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास नाशिक पोलिसांकडून केला जाणार आहे.

या प्रकरणात माधव कारभारी वाघ, अंजना राजेंद्र देवरे, राहुल गबा शेळके आणि मुलीची आई शिला मनोहर बनकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली 

सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, 

पोलीस हेड कॉन्स्टेबल बोधगिरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी कार्यवाही केली.

अल्पवयीन मुलीच्या जबाबाची गांभीर्याने दखल घेत सांगोला पोलिसांनी प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, आता नाशिक पोलिसांकडे तपासाची पुढील सूत्रे गेली आहेत.

 या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि संबंधितांची भूमिका तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments