Breaking News

श्रावणी सोमवारनिमित्त सावे येथे २२१ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा

श्रावणी सोमवारनिमित्त सावे येथे २२१ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा


 

सांगोला : प्रथम श्रावणी सोमवारचे औचित्य साधत सावे येथील महादेव मंदिर परिसरात भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

 सावे ग्रामपंचायत, रोटरी क्लब ऑफ सांगोला आणि दक्षता हॉस्पिटल, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य

 तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले, तर उपस्थित भाविकांसाठी फराळाचेही आयोजन करण्यात आले.

सावळेश्वर मंदिर ट्रस्टच्या महादेव मंदिरात १७ ऑगस्ट रोजी झालेल्या या उपक्रमात विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.

 विशेषतः मुतखडा व मूत्ररोगाच्या रुग्णांची तपासणी करून आवश्यक शस्त्रक्रिया व पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसंदर्भात आवश्यक सल्लाही देण्यात आला.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष माणिक भोसले, डॉ. शिवराज भोसले, डॉ. निरंजन केदार,

 सावेचे सरपंच शिवाजी वाघमोडे, माजी सरपंच संभाजी देवकते, सावळेश्वर मंदिर ट्रस्टचे पोपट बंडगर, संजय सरगर, भारत शेजाळ, संजय गडदे यांच्यासह गावातील ज्येष्ठ व युवा नेते उपस्थित होते.

दक्षता हॉस्पिटलच्या वतीने डॉ. वृषाली होनमाने, डॉ. विश्वजीत घोंगडे, डॉ. किरण सरगर तसेच नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांनी आरोग्यसेवा दिली. धनराज ॲम्बुलन्सचे सचिन चांदणे यांचेही सहकार्य लाभले.

एकाच दिवशी २२१ रुग्णांची मोफत तपासणी

सावे पंचक्रोशीसह परिसरातील ग्रामस्थांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबिरात तब्बल २२१ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 

आरोग्यसेवेसोबतच औषध वितरण आणि फराळ वाटपामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय व सेवाभावी वातावरण निर्माण झाले होते.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. 

धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत आयोजकांनी श्रावणी सोमवारचा दिवस समाजोपयोगी उपक्रमातून विशेष ठरविला.

Post a Comment

0 Comments