Breaking News

सांगोल्यात शेतकऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर यश; १९ ऑगस्टपासून १५०, तर २५ ऑगस्टपासून २२५ क्युसेक पाणी देण्याचे आश्वासन

सांगोल्यात शेतकऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर यश; १९ ऑगस्टपासून १५०, तर २५ ऑगस्टपासून २२५ क्युसेक पाणी देण्याचे आश्वासन


सांगोला : नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक ५ वरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर यश आले आहे.

 फलटण येथील शाखा अभियंता श्री. रा. प. मोरे यांनी सांगोला येथे आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १९ ऑगस्ट २०२६ पासून फाटा क्रमांक ५ ला १५० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून, २५ ऑगस्टपासून त्यामध्ये आणखी ७५ क्युसेकची वाढ करून एकूण २२५ क्युसेक पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपलब्ध पाण्याचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, तसेच विहिरींच्या तळामध्ये पाणी सोडून भूजलपातळी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालय, सांगोला येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनस्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णयाची माहिती दिली.

आंदोलनस्थळी उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये उपविभागीय अभियंता श्री. रा. म. धोत्रे, उपविभागीय अभियंता श्री. श्रीरंग टवरे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. अभिजीत नवले आणि कनिष्ठ अभियंता श्री. दि. बु. तांबडे यांचा समावेश होता.

दरम्यान, शाखा अभियंता मोरे यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले असले तरी २५ ऑगस्टपर्यंत नेमका व योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा इशाराही शेतकरी बांधवांनी दिला आहे.

“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील; पाणी आमचा हक्क, आम्ही घेणारच!” असा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments