सोलापूर विधान परिषद निवडणुकीत ९९.६८ टक्के विक्रमी मतदान; ६१६ पैकी ६१४ मतदारांनी बजावला
हक्कपाच केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद; राऊत-देशमुख लढतीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष
सोलापूर| प्रतिनिधी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी जिल्हाभरात उत्साहपूर्ण आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत मतदारांनी विक्रमी प्रतिसाद देत तब्बल ९९.६८ टक्के मतदानाची नोंद केली.
जिल्ह्यातील एकूण ६१६ मतदारांपैकी ६१४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर केवळ दोन मतदार मतदानापासून दूर राहिले.
या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले.
उत्तर सोलापूर केंद्रात दोन मतदार अनुपस्थित राहिल्याने तेथील मतदानाची टक्केवारी ९८.९४ इतकी राहिली.
केंद्रनिहाय मतदानाचा आढावा :
• उत्तर सोलापूर – १८८ पैकी १८६ मतदान (९८.९४%)
• कुर्डूवाडी – ८० पैकी ८० मतदान (१००%)
• दक्षिण सोलापूर – ८९ पैकी ८९ मतदान (१००%)
• पंढरपूर – १०० पैकी १०० मतदान (१००%)
• मंगळवेढा – ६२ पैकी ६२ मतदान (१००%)
• अकलूज – ९७ पैकी ९७ मतदान (१००%)
• एकूण – ६१६ पैकी ६१४ मतदान (९९.६८%)
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार
वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, राजकीय वर्तुळात ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांपुरती
मर्यादित नसून, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिली जात आहे.
संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीचे पारडे जड मानले जात असले, तरी महाविकास आघाडीनेही काट्याची टक्कर दिल्याची चर्चा आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या रणनीतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, वसंतराव देशमुख अनपेक्षित निकाल देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्यानंतर आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
राजेंद्र राऊत अपेक्षेप्रमाणे विजय मिळवणार की वसंतराव देशमुख राजकीय समीकरणे बदलणार, याचा फैसला मतमोजणीनंतर होणार आहे.


0 Comments